पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु…कोण मारणार बाजी…?

न्यूज डेस्क – आमदार भारत भालके यांच्या दुख:द निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती, त्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर विधानसभा मतदार संघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानप्रक्रिया सुरु झाली. राज्यात ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची समजली जात असून या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके तर महायुतीचे समाधान आवताडे हे रिंगणात आहेत. त्यांना स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष शैला गोडसे यांनी जोरदार आव्हान दिलं आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज 17 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालणार आहे.एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार असलेल्या या मतदारसंघात 524 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. त्यामध्ये 328 मूळ मतदान केंद्र, तर 196 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1048 बॅलेट युनिट व 524 व्हीहीपॅट मशीन असणार आहेत. तसेच 210 कंट्रोल युनिट, 420 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली असून मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करण्यात आलेले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक चुरशीची लढत मानली जात आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकून होते.त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देणार.? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here