पालकमंत्र्यांच्या परिसरास भेटी म्हणजे ‘पर्यटन दौरेच’…


प्रतिनिधी – महाआघाडीच्या सरकार स्थापणेनंतर मा. एकनाथ शिंदे साहेबांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले तेव्हा सुध्दा शिंदे साहेबांचा दौरा झाला होता. त्या वेळेस सुध्दा घोषणाबाजी झाली होती पण पुढे काम काही दिसले नाही. कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर जिल्ह्याला नाना संकटांना सामोरे जावे लागले होते. कडक संचारबंदी मुळे ऊद्भवलेल्या ऊपासमारीच्या परिस्थीतीत राज्य सरकार तर्फे जिल्ह्याला कोणताही दिलासा मिळाला नाही.

केंद्र सरकारने पाठविलेला निधी संपताच क्वारंटाइन सेंटरला अन्नधान्य पुरवठा सुध्दा बंद झाला. परराज्यातुन परतलेल्या मजुरांची ससेहोलपट बघायला सुध्दा कोणी वाली नव्हता. सरकार मधील नेते गडप झाले होते. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बदलल्याने चित्र बदलेल अशी आशा होती पण ती सुध्दा धुळीस मिळाली. पुन्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी परत शिंदे साहेबांकडे आली. यात राज्य सरकार मधील अंतर्गत कुरघोडीचे राजकारणच असुन जनतेचे सरकारला सोयर सुतक नाही.

पालकमंत्री पदाची पुनश्च जबाबदारी स्विकारल्यावर जिल्ह्यासाठी मोठ्या निधीची घोषणा,एखादे मदत निधीचा पॅकेज अथवा ठोस कृती कार्यक्रम घोषीत होईल असे वाटले होते परंतु त्यांची ही केवळ शिष्ठाचार भेट होती. पुन्हा मोठमोठ्या घोषणां व्यतिरीक्त काहीच आढळले नाही. सरकार स्थापनेपासुन आज पर्यंत नव्या सरकारने केलेले एक सुध्दा काम सांगता आले नाही. पहिल्यांदा अहेरी ऊपविभागाला भेट दिली होती परंतु त्यात आढावा बैठक झाली नाही.

जनतेला समस्या मांडण्याची संधी देखील नव्हती. आमदार साहेबांच्या निवासस्थानाला भेट देऊन सिरोंचास केव्हा निघुन गेले हे कळले सुध्दा नाही. सिरोंचाला सुध्दा औपचारीक भेटी देऊन हवाई पर्यटन केले. जनतेच्या नशिबी पोकळ आश्वासनेच आली. सरकार मधील नेते मंडळी वृत्तपत्रां मार्फतच आवाहने, घोषणा करण्यात गुंग आहेत. खतांची काळाबाजारी व लाॅकडाऊन मुळे ऊद्भवलेल्या समस्यांनी कंबरडे मोडलेल्या शेतकर्‍यांसाठी आणि जनतेसाठी कोणालाच वेळ नाही.

ऊद्या येणार- ऊद्या येणार म्हणता म्हणता महापुर आला पण पालकमंत्री आले नव्हते. महापुरा नंतरही हवाई दौरा करुन केवळ मातब्बर व्यक्तींना भेटी देऊन परत गेले. सामान्यांना भेटुन मायेची फुंकर घालावी असे त्यांना वाटत नसल्याचे दिसते. शासणाच्या बेजबाबदारपणा मुळे ऊद्भवलेल्या कृत्रीम महापुराला मध्यप्रदेश सरकारची चुक सांगुन हात झटकले आणि घोषणाबाजी करुन निघुन गेले.

दोन दिवसांपुर्वी सुध्दा संजय सरोवर मधुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला पण ह्या वेळेस पुर आला नाही ह्यावरुन मागचा महापुर महाराष्ट्र शासण निर्मीत होता यावर शिक्कामोर्तब झाले.

मुंबई- ठाण्यात कंटाळा आला की पालकमंत्री साहेब जिल्ह्यात फेरफटका मारुन विक एन्ड साजरा करतात असेच दिसते. जिल्ह्याची फरफट लवकर संपेल असे दिसत नाही.
दिनांक – १३/०९/२०२० स्थळ- अहेरी श्री. रवी रतनया नेलकुद्री ( तालुकाध्यक्ष,भा.ज.प.अहेरी )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here