विदर्भ साहित्य संघ शाखा रामटेक तर्फे गुणवंतांचा सत्कार…

राजु कापसे
रामटेक

विदर्भ साहित्य संघ शाखा रामटेक तर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत रामटेक येथील गुणवंत शिक्षकांचा शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या विशेष उपलब्धीनिमित्त कवी कुलगुरू कालिदास स्मारक परिसरात संपन्न झालेल्या कार्यक्रमात भावपूर्ण सत्कार नुकताच करण्यात आला.

रामटेक येथील विद्यासागर कला महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक डॉ. रवींद्र पानतावणे यांना नुकतीच इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. रामटेक येथील सौ. प्रतिभा प्रशांत कुंभलकर यांनासुद्धा नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची मराठी विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त झाली. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे रामटेक येथील प्रबोधनकार महिला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य श्री.संतोष ठकरेले यांनी ‘समाजशास्त्र’ विषयात तसेच त्यांच्या पत्नी सौ गंगा संतोष ठकरेले यांनी ‘मराठी’ विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल या दोघांचाही भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याला विदर्भ साहित्य संघ शाखा रामटेकचे कोषाध्यक्ष डॉ. सावन धर्मपुरीवार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. रामटेक परिसरातील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव श्री ऋषिकेश किम्मतकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यात चारही सत्कार मूर्तींचा शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांनीसुद्धा आपले विचार मांडले.याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे अनेक पदाधिकारी आणि रसिक मंडळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जगदीश गुजरकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पवन कामडी यांनी केले.आभार विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. गिरीश सपाटे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिनाज पौचातोड , राजेंद्र बावनकुळे, सौ. शिल्पा ढोमणे, सौ. उमा काठीकर इत्यादींनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here