यवतमाळ जिल्ह्यात दीड लाखांच्या वर नागरिकांचे लसीकरण…

यवतमाळ जिल्ह्याला १२ हजार लसींचे डोज प्राप्त…

यवतमाळ – सचिन येवले

राज्याने रविवारी लसीकरणाचा एक कोटींचा टप्पा ओलांडला असतांनाच यवतमाळ जिल्ह्यातही आतापर्यंत दीड लाखांच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लसीचा साठा अल्प प्रमाणात असतांनाच शनिवारी रात्री जिल्ह्याला 12 हजार लसींचे डोज प्राप्त झाले आहे. लसींची अतिरिक्त मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला 16 जानेवारी रोजी सुरवात झाली. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लक्ष 52 हजार 711 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्याला आतापर्यंत कोव्हीशिल्ड लसीचे 1 लक्ष 35 हजार तर कोव्हॅक्सीनचे 18800 डोज प्राप्त झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 56 हजार 176 नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे.

यात आरोग्य विभागातील 22818 नोंदणी करण्यात आली असून यापैकी 16677 जणांना पहिला डोज तर 7292 जणांना दुसरा डोज देण्यात आला. जिल्ह्यात 20661 फ्रंटलाईन वर्करची नोंदणी झाली असून यापैकी 16397 जणांना पहिला डोज तर 5585 जणांना दुसरा डोज दिला आहे.

तसेच 45 वर्षांवरील नागरिकांची नोंदणीची संख्या 1 लक्ष 12 हजार 692 असून यापैकी 1 लक्ष 4 हजार 705 जणांना पहिला डोज तर 2055 जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. जास्तीत जास्त पात्र नागरिकांच्या लसीकरणाला प्रशासनाने प्राधान्य दिले असून जिल्ह्यासाठी लसींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

लसीकरण झाल्यावरसुध्दा नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यात मास्कचा नियमित वापर, सहा फुटांचे सुरक्षित अंतर, नियमित हातांची स्वच्छता आदींचा समावेश आहे. स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी म्हणून नागरिकांनी लक्षणे आढळताच कोणताही वेळ वाया न घालवता त्वरीत कोव्हीडची चाचणी करून घ्यावी. तसेच कुटुंबातील 45 वर्षांवरील पात्र नागरिकांनी त्वरीत लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here