अकोला: अज्ञात चोरट्यांनी कापूस व्यापाऱ्याचे लाखो रुपये लुटले…

अकोला:दुचाकीने जाणा-या व्यावसायीकाला रात्रीच्या सुमारास तोंडाला कापड बांधलेल्या व हातात विळे असलेल्या चार अज्ञात इसमांनी,अडवुन त्यांच्या खिशातील मोबाईल व पिशवीमधील ६ लाख ४६ हजार ९२० रुपये रोख घेऊन पसार झाल्याची घटना घडली. अकोट ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आसेगाव बाजार येथील गोपाल बापुराव सानप यांच्या तक्रारीनुसार ते शरद गोपालराव पुंडकर यांच्यासोबत भागीदारीत शेतकऱ्यांजवळून कापूस व इतर धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात.

गावातील शेतकऱ्यांचा कापूस त्यांनी घेतला होता. तसेच अकोट येथील संजय अकोटकार या जिनिंग मालकाला विकला होता. त्या मोबदल्यात अकोटकार यांनी शेतकऱ्यांच्या नावे ६ लाख ४६ हजार ९२० रुपयांचे धनादेश दिले होते.

त्यानंतर अकोटकार यांनी ६ मार्च रोजी खात्यात पैसे नसल्याचे सांगून धनादेश न वटविता, रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी गोपाल सानप यांना बोलाविले. त्यानुसार ८ मार्च रोजी दुपारी दोन वाजता सानप एक कापसाची ट्राॅली घेऊन जिनिंगमध्ये पोहचले.

या ठिकाणी कापूस विक्री करुन सांयकाळी ७ वाजता जिनिंग मॅनेजर संतोष कडे यांच्याजवळून ६ लाख ४६ हजार ९२० रुपये रोख रक्कम घेतली आणि दुचाकीने ताजनापूर-वडगाव मार्गे आसेगाव बाजारला निघाले. हमीद मास्तर यांच्या शेताजवळ तोंडाला कापड बांधलेल्या व हातात विळे असलेल्या चार अज्ञात इसमांनी, त्यांना रात्री ८.३० वाजता सुमारास अडविले.

त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील मोबाईल व पिशवीमधील ६ लाख ४६ हजार ९२० रुपये रोख घेऊन पसार झाले. घटनेची माहिती त्यांनी मित्र व गावकऱ्यांना दिली. त्यानंतर रात्री पोलीस स्टेशनला माहिती देण्याकरिता सानप पोहोचले.

परंतु घाबरलेले असल्यामुळे सानप यांना किती रक्कम लंपास झाली हे आठवत नसल्याने त्यांनी ९ मार्च रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here