दुपारी आजोबावर झाला अंत्यसंस्कार…रात्री काकाने केला बारा वर्षाच्या पुतणीवर बलात्कार…चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना…

राकेश दुर्गे,चंद्रपुर

घरात आजोबाचा मृत्यू झालेला…रितीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यासाठी आलेल्या पाहुण्यांना जेवणाची पंगत वाढत असताना काकाने बारा वर्षीय पुतणी बाहेर गेल्याची संधी साधली…तिला ओढत घराशेजारी असलेल्या बांबुच्या रांजीत नेले व तिथेच तिच्यावर बलात्कार केला. गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा संतापदायक प्रकार समोर आला.

गोंडपिंपरी तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर येनबोथला येथे पीडित मुलीच्या आजोबाचे काल निधन झाले. दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी पाहुण्यांसह जेवण करायला बसले. पाहुण्यांना जेवण देत असताना सदर मुलगी घरातून बाहेर पडली. यावेळी कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी काका कमलाकर राऊत याने तिला घराजवळच असलेल्या रांजीत नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

काही वेळातच मुलीचे वडील हे घराबाहेर निघाले असताना मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असता घटनास्थळावरून आरोपी कमलाकर राऊत याने पळ काढला. मुलीला विचारपूस केली असता काकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिने दिली. एवढंच नाही तर यापूर्वी देखील कमलाकर राऊत याने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता व ही माहिती कुणाला सांगितली तर तुला जीवे मारीन, अशी धमकी सुद्धा दिली होती.

त्यामुळे भीतीपोटी मुलीने घरच्यांना ही बाब सांगितली नाही. मुलीवर झालेला अत्याचार पाहून पालकांनी लगेचच रात्री गोंडपिपरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप दुबे यांनी आपल्या सहका-यांसह येनबोथला गाव गाठले व गावालगत पाण्याच्या टाकीजवळ लपून असलेल्या कमलाकरला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

पीडित मुलीला उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील प्रमुख माणसाच्या मृत्यूनंतर त्याच रात्री बारा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणा-या काकाच्या कृत्याबाबत तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, या नराधमावर तातडीने कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here