मनोर ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामावर तहसीलदारांचा कारवाईचा बडगा…

निर्माणाधिन तीन इमारतींना बजावली नोटीस, १६ तारखेला सुनावणी…

मनोर – मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असल्याने मनोर गावच्या हद्दीत मोठमोठे गृहप्रकल्प आणि निवासी इमारती बांधल्या आहेत.यातील अनेक निवासी आणि वाणिज्यिक इमारतींचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय बेकायदेशीर रित्या करण्यात आल्याच्या तक्रारी तहसीलदार कार्यालयात करण्यात आल्या होत्या.

त्यामुळे पालघरच्या तहसीलदारांनी मनोर गावातील तीन निर्माणाधिन इमारतींना अवैध बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे.इमारत बांधकाम प्रकरणी आवश्यक कागदपत्रांसह लेखी खुलासा करण्यासाठी हजर राहण्याची तंबी देण्यात आल्याने मनोर मधील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मनोर गावाचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे.जिल्हा मुख्यालयापासून वीस किलोमीटर अंतरावर आणि महामार्गालगत मनोर असल्याने पंचक्रोशीतील आणि परजिल्ह्यातील नागरिकांची मनोरमध्ये गर्दी वाढत आहे.त्यामुळे मनोर गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे.

वाढत्या लोकसंख्येसाठी मनोर गावात अनेक गृहनिर्माण प्रकल्प आणि इमारतींची बांधकामे सुरू झाली आहेत.यात अनेक इमारतींचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय बेकायदेशीर रित्या करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या हरकतींना केराची टोपली दाखवण्यात आली होती.

गेल्या वर्षी मनोर गावातील मिळकत क्र.77/अ, 7/1,7/2,7/3 आणि 20,120 या ठिकाणी जुने बांधकाम तोडून नवीन व्यावसायिक इमारतींच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती.ग्रामपंचायत प्रशासनाने या बांधकामांना परवानगी नाकारली होती.

त्यानंतरही जागा मालकांनी इमारतींचे बांधकाम सुरूच ठेऊन इमारतींचे बांधकाम पूर्ण केल्याचे समोर आले आहे. या बांधकाम प्रकरणी पालघरच्या तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर पालघरचे तहसीलदार सुनिल शिंदे यांनी मनोर गावातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी तिघांना नोटीस काढली आहे.16 तारखेला बांधकामाची आवश्यक कागदपत्रे आणि लेखी खुलाश्यासह पालघरला हजर राहण्यास बजावण्यात आले आहे.

अन्यथा महसूल अधिनिय 1966 च्या कलम 45 (2) आणि शर्तींचा भंग केल्याप्रकरणी जमीन सरकार जमा करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीद्वारे बजावण्यात आले आहे.

मनोर गावातील बेकायदेशीर बांधकामांवर तहसीलदारांनी कारवाईचा फास आवळल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.याप्रकरणी तोडक कारवाई करण्याची मागणी मनोरच्या ग्रामस्थांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here