उमरखेड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मनसे मैदानात…..

मनसेचा पंधरा दिवसाचा अल्टिमेटम….संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको करणार….

उमरखेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी गेल्या चार वर्षापासून आंदोलन, उपोषण, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समितीकडून केले जात आहे,परंतु काही राजकीय पुढाऱ्यांच्या स्वार्थासाठी पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित ठेवल्या जात आहे या विषयाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळ च्या वतीने आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळ च्या वतीने याप्रसंगी आपली रोखठोक भूमिका मांडत येत्या पंधरा दिवसात पुतळ्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास संपूर्ण जिल्हाभर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा याप्रसंगी दिला गेल्या तीस वर्षापासून पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित आहे .उमरखेड नगरपालिकेतील 24 पैकी 17 नगरसेवकांनी पुतळ्याच्या भूमिकेसाठी आपला पाठिंबा दर्शविला असताना काही मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न हा प्रलंबित ठेवल्या जात आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींच्या पुतळ्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागावी यापेक्षा काय दुर्दैव असावे.

उमरखेड नगरपालिकेतील 17 पैकी सहा नगरसेवक हे मुस्लिम समाजाचे आहेत त्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा छत्रपती शिवाजी चौकातच व्हावा ही भूमिका मांडली आहे एकीकडे सामाजिक सलोखा राखावा म्हणून सर्व उमरखेड वासी प्रयत्न करत असताना काही राजकीय पुढारी मात्र उमरखेड सामाजिक वातावरण कसं गढूळ होईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे .उमरखेड नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत हा अश्वारूढ पुतळा पुतळा संघर्ष समितीच्या वतीने प्रस्तावित आहे परंतु नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातल्या इतर ठिकाणी हा पुतळा बसविण्याचे प्रयत्न सुरू आहे.

आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांना मनसेच्या दिलेल्या निवेदनातून तात्काळ हा प्रश्न निकाली निघावा सोबतच उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना संबंधित पुतळ्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश द्यावेत अशा संदर्भाची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना अनिल हमदापुरे यांनी ज्या शिवरायांनी संपूर्ण देशाचा स्वराज्य अबाधित राखत आज आपल्याला ताठ मानेने जगणे शिकवलं त्या छत्रपतींच्या पुतळ्यासाठी संघर्ष करावा लागावा यापेक्षा या महाराष्ट्राचे काय दुर्दैव असावे असे मत मांडत पुतळा ला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र द्रोही झारीतील शुक्राचार्य यांचा समाचार यापुढे मनसे घेईल असा इशारा याप्रसंगी दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष डेव्हिड शहाणे पूर्वीपासूनच अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीच्या माध्यमातून या लढाईमध्ये सहभागी असून आता त्यांच्या पाठीशी संपूर्ण यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी असून आता छत्रपती शिवरायांचा पुतळा छत्रपती शिवाजी चौकातच बसविणार असा ठाम निर्धार मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी व्यक्त केला. छत्रपतींच्या या पुतळ्यासाठी गेल्या तीस वर्षापासून संघर्षरत असलेल्या शिवभक्तांसाठी मनसे सरसावली असून वेळप्रसंगी उमरखेड नगरपालिका विरोधात छत्रपतींच्या पुतळ्यासाठी खळखट्याक ची भूमिका मनसे घेईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

आज जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान निवेदन देताना प्रामुख्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, मनसेचे उमरखेड विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष डेव्हिड शहाणे, तालुका अध्यक्ष सादिक शेख, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण भिमटे, अवधूत खडककर, मुकुंद जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here