मनोर – पालघर तालुक्यातील बोईसर चिल्हार रस्त्यावरील वारांगडे गावच्या हद्दीत बुधवारी(ता.03) रात्री आठ वाजताच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला.यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभीर जखमी झाला. विशाल धोंडी असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून तो खैरापाड्याचा रहिवासी होता.तर गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारावर बोईसरच्या थुंगा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बोईसर चिल्हार रस्त्यावर चिल्हारच्या दिशेने वारांगडे गावच्या हद्दीतील धोकादायक वळणावर बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला.यामध्ये दुचाकी स्वाराचा कंटेनरच्या टायर खाली चिरडून मृत्यू झाला.
तर दुचाकीच्या मागे बसलेला तनेश लोत नामक तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त दुचाकीस्वार बोईसरच्या खैरापाड्याचे रहिवासी आहेत.
बोईसर – चिल्हार रस्त्याच्या चौपदरीकरण्याच्या कामादरम्यान अपघाती आणि तीव्र स्वरूपाची वळणे कमी करण्यात आली नाही. अवजड वाहनांचा वाढलेला वेग आणि रस्त्यावरील तीव्र स्वरूपाच्या वळणामुळे अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. औद्योगिक विकास महामंडळा मार्फत चौपदरीकरण करून तयार करण्यात येत असलेला रस्ता अपघाताला निमंत्रण देत असल्याने स्थानिकांनी संताप केला आहे.