‘त्या’ प्रकरणी आणखी दोघांना अटक…विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने बिबटचा मृत्यू…एलसीबीच्या कारवाईने वनविभागाची उडाली झोप…

भंडारा : उसाच्या मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. यात अडकून मृत पावलेल्या बिबट्याच्या कातडीची विक्री करणाऱ्या चौघांना काल रात्री अटक केली होती. आज पुन्हा दोघांना अटक केली आहे. हे दोघेही सख्ये भाऊ असून आरोपींची संख्या सहा झाली आहे. त्यांच्याकडून बिबट्याचा जबडा जप्त केला आहे. एलसीबीने केलेल्या कारवाईने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र झोप उडाली असून त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


◆ चंद्रशेखर छगन रामटेके (४०) आणि रंजित छगन रामटेके (२६) रा. खैरी (पिंडकेपार) ता. साकोली असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. एलसीबीच्या पथकाने या दोघांकडून मृत बिबट्याचा जबडा जप्त केला आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत एक लाख रुपये आहे. या कारवाईत एलसीबीने अंदाजे २५ लाख रुपये किंमतीची एक बिबट कातडी, जबडा, तीन मोटारसायकल, चार मोबाईल, स्पोर्ट्स बॅग असा एकूण २७ लाख ११ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


◆ बुधवारला एलसीबीने पंकज दिघोरे, लक्ष्मीकांत नान्हे, दुर्योधन गहाणे आणि योगेश्वर गहाणे या चौघांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून अन्य दोघांना अटक केली आहे. उसाच्या मळ्याच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण लावले होते. त्या तारेला विद्युत पुरवठा केला होता. शेतातून संचार करताना बिबट त्यात फसला आणि विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाला. ही घटना दडपण्यासाठी आणि मृत बिबट्याची विल्हेवाट लावण्यासाठी अवयव वेगवेगळे केले.

त्याची कातडी विकण्याचा प्रयत्न करीत असताना एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कंकाडे यांच्या पथकाने सिनेस्टाईल कारवाई करीत सर्वांना अटक केली. बिबटची शिकार होऊनही वन विभागाला याची जराही माहिती मिळाली नाही, यावरूनचं वनाधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावरूनच अन्य वन्य प्राण्यांच्याही शिकारी मोठया प्रमाणावर झाल्या असाव्या, याबाबत आता शंका उपस्थित होत आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भरती यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तूरकुंडे, पोलीस उपनिरीक्षक उईके, एलसीबीच्या पथकातील सुधीर मडामे, रोशन गजभिये, नितीन महाजन, मंगेश मालोदे, चेतन पोटे, स्नेहल गजभिये, गौतम राऊत, विजय तायडे, अमोल, कौशिक गजभिये, नंदू मारबते, धर्मेंद्र बोरकर, मोहरकर, डहारे, बंटी मडावी, खराबे आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here