दिवाळी आली…औरंगाबाद सराफा बाजारात कोटींची उलाढाल..!

औरंगाबाद – ऋषिकेश सोनवणे

कोरोनामुळे मागील वर्षी सराफा मार्केटमध्ये जाऊन सोनं-चांदी खरेदी करता आली नाही. काही निर्बंध देखील असल्याने सराफा मार्केटकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. मात्र यावर्षी दिवाळीच्या आणि धनत्रोयदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीवर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात भर दिली जात आहे. सराफा मार्केटमध्ये सोन्याचे दागिने-चांदीचे शिक्के घेण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर भरती करत असल्याची माहिती सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष दिनेश दहीवाल यांनी दिली.

दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी धूम असते. त्यातल्या त्यात धनत्रोयदशी आणि लक्ष्मीपूजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोनं- चांदी खरेदीवर भर दिला जातो. मागील वर्षी कोरोनामुळे निर्बंध असल्याने दिवाळी सण देखील साध्या पद्धतीने साजरा करावा लागला होती. परंतु यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी करत आहे.

सोन्याच्या दुकानात देखील खरेदी केली जात असून यावर्षी सोन्याचे दागिने आणि लक्ष्मीचा चांदीचा शिक्का, श्री यंत्र आदी चांदीच्या शिक्क्यांना मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. जवळपास १५ ते २० कोटी रुपयांचे सोने चांदी विक्री होईल अशी अपेक्षा असल्याचेही सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष दहीवाल यांनी सांगितले.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोनं चांदी खरेदीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्यामुळे व्यापारी वर्गात मोठा उत्साह आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर ५० हजारांवर जाऊन पोहचले होते. परंतु गेले आठ दिवसापासून सोन्याचे दर हे तीनशे रुपयांनी कमी झाले असून प्युअर सोन्याचे दर हे ४९ हजार ७०० वर आले आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४५ हजार ७०० आहे. याशिवाय चांदीचे दर मात्र वाढले आहे. आठ दिवसापूर्वी चांदीचे दर ६५ हजारांवर होते. त्यात आता वाढ होऊन ६९ हजार रुपये किलो चांदी विक्री केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here