आदिवासी महिलेची बांधावर प्रसूती…कमी दिवसांचे बाळ दगावले…दूर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील काटेला पाड्यातील घटना…

काटेला पाडा दोन दशके रस्त्याविना, ग्रामस्थांची गैरसोय.

मनोर – नविद शेख

जिल्हा निर्मितीच्या सहा वर्षानंतरही जिल्ह्याचा विकास झालेला नसल्याचा प्रत्यय एका घटनेमुळे समोर आला आहे.शुक्रवारी (ता.11)रस्त्या अभावी चादरीच्या झोळीतून दवाखान्यात नेत असताना एका गर्भवती महिलेला शेताच्या बांधावर झालेल्या प्रसूतीत आपलं बाळ गमवावं लागल्याची घटना उघडकीस आली आहे.

जिल्हा मुख्यालयापासून तीस किलोमीटर अंतरावर दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीतील काटेला पाड्यात ही घटना घडली आहे.आरोग्य विभागाचे कर्मचारी शनिवार सायंकाळ पर्यंत पोहोचले नसल्याने आदिवासींनी संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे.

मनोर नजीकच्या दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीत वैतरणा नदी किनारी मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या उत्तरेला काटेला पाडा वसलेला आहे.आदिवासी बहुल पन्नास कुटुंब राहत असलेल्या या पाड्यात पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही.पावसाळ्यात भात शेती मुळे काटेला पाड्यातील ग्रामस्थांना शेतांच्या बंधावरून वाट काढत घर गाठावे लागते.

मुसळधार पावसात त्यांच्या गैरसोयीत वाढ होते. मनोर पासून हाकेच्या अनंतरावर असूनही वैतरणा नदी मुळे पलीकडे जाता येत नाही.मुंबई अहमदाबाद महामार्ग एक किलोमीटर अंतरावर असताना जोड रस्त्या अभावी काटेला पाड्यातील ग्रामस्थांची पावसाळ्यात मोठे हाल होत आहेत.

शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास काटेला पाड्यातील शुभांगी विनोद वळवी या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या.रस्त्या अभावी कुठलेही वाहन पाड्यात पोहचू शकत नसल्याने गर्भवती महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला चादरीच्या झोळीत भरून दुर्वेसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात होते.

परंतु वाटेत प्रसूती वेदना वाढल्याने शेताच्या बांधावर तीची प्रसूती होऊन कमी दिवसांचे बाळ दगावले.वैद्यकीय निगराणी शिवाय गर्भपात झाल्याने महिलेचा जीवाला धोका निर्माण झाला असताना शनिवार सायंकाळ पर्यंत आरोग्य यंत्रणा काटेला पाड्यात पोहोचली नसल्याने ग्रामस्थांनी आरोग्य विभाग,ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

दुर्वेस ग्रामपंचायतीचा भूभागाचे महामार्गामुळे दोन भागात विभाजन झाले आहे. महामार्गावच्या पश्चिमेला वैतरणा नदी किनारी काटेला पाडा आहे.ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून काटेला पाड्यात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. बाजारपेठ,प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शिक्षणासाठी ग्रामस्थांना चिखल तुडवीत दुर्वेस किंवा मनोर गाठावे लागते.पावसाळ्यात शेताच्या बांधावरून चालताना विंचू आणि सर्पदंश झाल्याचा घटना याआधीही घडल्या आहेत.

रस्त्या अभावी वैद्यकीय निगराणी शिवाय उघड्या आभाळाखाली नैसर्गिक गर्भपात झाल्याने महिलेला बाळ गमवावे लागले असून तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. लत्यामुळे पंचक्रोशीत प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण आहे.त्यामुळे या घटनेची चौकशी करण्याची मागणी काटेला पाड्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

■गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीत सत्तेत असलेल्या निष्क्रिय लोकांमुळे काटेला पाडा रस्ता रखडला आहे. बाळ दगावण्याच्या घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

■विष्णू कडव,
समाजकल्याण सभापती, जिल्हा परिषद पालघर.

ही महिला सहा महिन्यांची गर्भवती होती.वेदना सुरू झाल्यानंतर वेळीच तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले नाही,त्यामुळे तिचा नैसर्गिक गर्भपात झाला आहे. आणि याआधी ही तिचा गर्भपात झाला होता.

■डॉ विजय सुर्यवंशी
जिल्हा आरोग्य अधिकारी,पालघर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here