कोका अभयारण्यात साग वृक्षाची तोड…वनाधिकारी यांच्या तोंडी आदेशानंतर वनमजुरांनी केली कटाई…

भंडारा – प्रशांत देसाई

वन्यजीवांसाठी राखीव असलेल्या एका वनात साग वृक्षाची कटाई केली. त्याची शासकीय वाहनाने विल्हेवाट लावण्यात आली. याची माहिती मिळताच ‘महाव्हॉईस’ने प्रकरण लावून धरत वेळोवेळी प्रकरणातील घडामोडी प्रसिद्ध केल्या.

‘महाव्हॉईस’ या प्रकरणाचा आता उलगडा करीत असून उचलून धरलेले हे प्रकरण भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कोका अभयारण्यातील आहे. येथे सागवान वृक्षाची तोड करण्यात आली, यात वनाधिकारी यांचा सहभाग असल्याचा ठोस पुरावा ‘महाव्हॉईस’च्या हाती आला आहे.

नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोका वन्यजीव अभयारण्यातील कक्ष क्रमांक १६८ मधील कसई गेट परिसरात सागवान वृक्षाची ही कटाई केली आहे. सुमारे ३० ते ३५ वर्षापूर्वीचे हे अवाढव्य सागवान वृक्ष असून ते वनमजुरांच्या हाताने कटाई केले आहे. या वृक्षाची गोलाई अंदाजे १५० ते १६० सेंटीमीटर असून लांबी सुमारे ७ मीटर आहे. हे सागाचे वृक्ष जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कटाई केले आहे. यासाठी वनाधिकाऱ्यांनी वनमजुरांचा वापर केला आहे.

सदर सागाचे वृक्ष तोडायला तीन वनमजुरांचा वापर केला. त्यानंतर तोडलेल्या झाडाचे तुकडे करण्यासाठी अन्य वनमजुरांचा वापर केला. दरम्यान, ही वृक्षतोड सुरू असताना वनाधिकारी यांचा ‘खानसामा’ हा रस्त्यावर उभा राहून ‘वॉचमॅन’ ची भूमिका निभावीत होता.

विशालकाय सागवान वृक्षाचे पाच तुकडे केले. यात सात फुटाचे तीन आणि पाच व सहा फुटाचे दोन तुकडे करण्यात आले. हे सर्व लाकूड शासकीय वाहनातून नेण्यात आले. याबाबत तत्कालीन वनरक्षक (सध्या यांची बदली प्रादेशिक वन विभागात) यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कटाई केलेल्या सागवृक्षाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार संपर्क साधल्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे वनाधिकारी यांची बाजू समजू शकली नाही.

पुढील भागात अवश्य वाचा…. कोण आहेत अधिकारी? गाडीत तोडलेले लाकूड भरले कोणी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here