तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी एका विधीसंघर्षित बालकासह तिघांना अटक…क्षुल्लक वादातून घडली घटना…

भंडारा : दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून १८ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना भंडारा शहरातील हेडगेवार चौकालगतच्या नाईक कोठीजवळ आज शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकासह तिघांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


◆ सरफराज कासम शेख (१८) असे मृतक युवकाचे नाव असून तो लाला लजपतराय वॉर्डातील रहिवासी आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी शुभम श्रीराम वाघाये (२५), राहुल राऊत (१८) आणि विधीसंघर्षित बालक सर्व राहणार राणी लक्ष्मीबाई वॉर्ड असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

मृतक सरफराज हा काही कामानिमित्त दुचाकीने घराबाहेर पडला होता. तो जलाराम चौकाकडून हेडगेवार चौकाकडे जात होता. त्याचवेळी हेडगेवार चौकाकडून जलाराम चौकाकडे एका दुचाकीवरून अटक केलेले तिघे निघाले होते. नाईक कोठीजवळ दुचाकीला कट मारल्यावरून आरोपी आणि मृतक यांच्यात वाद झाला.


◆ वाद विकोपाला गेल्याने आरोपीने तिथेच असलेल्या लोखंडी रॉडने मृतकावर हल्ला केला. कुणाला काही कळायच्या आत, हे हत्याकांड घडले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान, या हत्येची माहिती मिळताच भंडारा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस निरीक्षक लोकेश काणसे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांचे पथक तैनात करून हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेत सुरुवातीला शुभमला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने दिलेल्या माहितीवरून राहुल राऊत आणि विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.


◆ या प्रकरणी भंडारा पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बिसेन, भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधु, पोलीस निरीक्षक लोकेश काणसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

अधिक तपास पोलीस निरीक्षक काणसे यांचे मार्गदर्शनात सुरू असून आरोपींना अटक करण्यात डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे आणि पोलीस कर्मचारी यांची महत्वाची भूमिका राहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here