राज्यात जानेवारी, फेब्रुवारीमध्ये ३३ हजार ७९९ बेरोजगारांना रोजगार…

मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांद्वारे राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये 33 हजार 799 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

मागील वर्षी 2020 मध्ये अशा विविध उपक्रमांमधून राज्यात एक लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, असे त्यांनी सांगितले.चालू वर्षात जानेवारी महिन्यात 20 हजार 713 बेरोजगारांना तर फेब्रुवारी महिन्यात 13 हजार 086 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला.

मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in  हे वेबपोर्टल सुरु केले आहे. 

या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. 

अशा प्रकारे बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते. त्याचबरोबर विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. राज्यात या विविध उपक्रमांना बेरोजगार उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत.

रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठीचे हे उपक्रम यापुढील काळातही प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. यासाठी नोकरी इच्छूक तरुणांनी महास्वयंम वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी, आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईतफेब्रुवारीमध्ये सहाहजार 878 बेरोजगारांना रोजगार मंत्री श्री. मलिक म्हणाले की, माहे फेब्रुवारीमध्ये विभागाकडे 35 हजार 918 इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात 10 हजार 481, नाशिक विभागात चार हजार 773, पुणे विभागात 11 हजार 142, औरंगाबाद विभागात पाच  हजार 692, अमरावती विभागात एक हजार 346 तर नागपूर विभागात दोन हजार 484 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे फेब्रुवारीमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 13 हजार 086 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक सहा हजार878, नाशिक विभागात एक हजार 353, पुणे विभागात तीन  हजार 893, औरंगाबाद विभागात 695, अमरावती विभागात 145 तर नागपूर विभागात 122 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here