अकरावीच्या प्रवेशासाठी लेखी परीक्षा होणार…

फोटो- सौजन्य गुगल

न्यूज डेस्क : कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा लेखी होणार आहे. दहावीचा निकाल (10th Result) जुलै महिन्यात लावण्यात येईल आणि अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.

इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्र या विषयांच्या राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमाआधारे ही परीक्षा होईल.

सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक असून, जुलैअखेर किंवा ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा ऐच्छिक असली तरी ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत.

दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाबाबत निर्माण झालेल्या प्रशद्ब्रांवर शिक्षण विभागाने स्वतंत्र प्रवेश परीक्षेचा तोडगा काढला. अकरावीसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून ही परीक्षा ऐच्छिक असेल. परंतु परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल, असे विभागाने जाहीर केले होते.

ही परीक्षा राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमावर होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. सीबीएसईसह इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, खासगी मंडळाचे विद्यार्थीही ही परीक्षा देऊ शकतील. परीक्षेच्या आयोजनासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वाढण्याची शक्यता आहे. प्रवेश परीक्षा आणि दहावीच्या निकालाच्या माध्यमातून अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या वाढणार असून त्यामुळे अकरावीसाठी सर्वांना प्रवेश मिळणार का, असा प्रशद्ब्रा उपस्थित झाला आहे. मात्र, गेल्या वर्षी राज्यातील ३२ टक्के जागा रिक्त असून त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण येणार नाही, असे विभागाचे म्हणणे आहे.

मात्र, काही विभागांत काही शाखांसाठी अधिक मागणी असते, तर गेल्या काही वर्षांपासून कला शाखेच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहात आहेत. त्यामुळे एकूण जागा रिक्त असल्या तरी विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेत प्रवेश मिळण्यासाठी चढाओढीला तोंड द्यावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here