महिला चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार पडली पाण्यात; पाच जणांना वाचवण्यात आले यश…

राजगुरूनगर ( पुणे ) : तारी त्याला कोण मारी’ असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र त्याचा प्रत्यय आज पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आला आहे. राजगुरूनगर जवळच्या सातकरस्थळ जवळून चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावरुन प्रवास करत असताना महिला चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार पाण्यात पडल्याची घटना घडली.

यावेळी साधना सातकर यांच्या सतर्कतेने कार मधील पाच जणांचे प्राण वाचले आहेत. स्थानिक तरुणांच्या मदतीने कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह त्यांच्या आई वडिलांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. पण पाण्याच्या प्रवाहात कार मात्र वाहून गेली आहे.

सातकर स्थळ येथे आज दुपारी साधना सातकर आपल्या घरासमोर असताना त्यांनी ही कार पाण्यात पडताना पाहिली. साधना यांनी आरडा ओरड करत जवळच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावलं. यात साधना यांचे पती अशोक सातकर, संदीप सातकर, तुषार सातकर ,

सुदर्शन मुळूक,माजी उपसरपंच सचिन सातकर, अविनाश खांगटे,ॠषीकेश सातकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यात उड्या मारल्या आणि कारचे दरवाजे उघडून कार मधील तीन चिमुरड्यांना व त्यांच्या आई वडिलांना बाहेर काढले.

कदाचित काही मिनिट जरी याकडे कुणाचं लक्ष गेलं नसतं तर खूप मोठा अनर्थ घडला असता.साधना सातकर या महिलेने आणि स्थानिक तरुण या कुटुंबा साठी प्राणरक्षक ठरले आहेत. या कारमध्ये राजगुरूनगर येथील एका सोसायटीमधील रहिवासी असलेले शिक्षक गणेश मगर यांच्या पत्नी व ३ मुले असल्याचं समजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here