हंडाभर पाण्यासाठी विहिरीत पडलेल्या महीलेचा दुर्दैवी मृत्यू…राहीबाई किनर ठरली तथाकथित समाजसेवक,अधिकारी-ठेकेदारांच्या बेजबाबदार पणाची बळी…

राहीबाईच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – श्रमजीवी संघटना

वाडा/दिनांक 11 सप्टेंबर

विहीरीच्या तळाशीअसलेल्या हंडाभर पाण्यासाठी विहिरीत उतरत असताना तोल जाऊन विहीरीत पडल्याल्या राहीबाई कीनर या महिलेचा आज दुर्दैव मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पती आणि दहा वर्षाच्या आतील तीन मुलं असा परिवार आहे. १९ मे २०२० रोजी पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामधील वरसाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नवापाडा येथे राहीबाई रघु किनर (३२) ही महिला पाण्यासाठी विहिरीत उतरताना तोल जाऊन विहीरीतल्या खडकावर पडल्याने गंभीर जखमी झाली होती.

त्यामुळे सदर गावात जलयुक्त शिवार योजनेतून विहिर नूतनीकरणाचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदार व अधिकारी तसेच राहीबाई यांच्या उपचाराची जबाबदारी घेणारे तथाकथित समाज सेवक हेच तिच्या मृत्युला जबाबदार असल्याचा आरोप श्रमजीवी संघटने कडून करण्यात आला आहे.

वरसाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नवापाडा येथे भीषण पाणी टंचाई असल्याने, गावामध्ये जलयुक्त शिवार अभियान योजनेमधुन सन २०१७ -२०१८ या वित्तीय वर्षामध्ये गावातील पाणी असलेल्या एका विहिरीचे नूतनीकरणाचे काम मंजुर करण्यात आले होते. त्यासाठी ७ लाख ४५,४६८ रुपये मंजूर करण्यात आले होते.

या कामासाठी ‘अली असगर हसन इंदुरिवला’ या ठेकेदाराला दि.३/११/२०१८ रोजी काम करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. सदर विहिरीच्या नूतनीकरणाच्या कामाची मुदत ३ महिन्यांची होती व दिनांक ०२/०२/२०१९ रोजी संपली होती. मात्र सदर विहीरीचे नूतनीकरणाचे काम आजपर्यंत पूर्ण झालेली नाही.

19 मे 2020 रोजी संध्याकाळी सहा वाजता राहीबाई पाणी काढण्यासाठी विहीरित उतरत असताना पाय घसरल्याने विहीरीत पडून अपघात झाला. या अपघातात तीच्या पाठीच्या मणक्याला, डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत होऊन ती अत्यवस्थ झाली होती.अपघातानंतर राहीबाई किनर यांना सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र परळी येथे दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय वाडा येथे दाखल करण्यात आले होते.

मात्र प्रकृती अधिकच गंभीर होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कळवा आणि नंतर सायन येथे देण्यात आले होते. सायन रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती उपचारानंतर राहीबाई घरी आली मात्र पुन्हा त्रास होऊ लागला त्यावेळी पुन्हा वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्यावेळी या प्रकरणाची दखल घेऊन राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष श्री विवेक पंडित (राज्यमंत्री दर्जा) यांनी आदिवासी विकास विभाग आणि तहसीलदार यांनी सदर महिलेवर उपचार करण्याबाबत सूचना केली होती.

श्री पंडित यांच्या सूचनप्रमाणे राहिबाई यांना पुढील चांगले उपचार मिळावे रुग्णालयात नेण्यासाठी तहसिलदार वाडा व आरोग्य विभाग व आदिवसी विकास विभागाचे अधिकारी यांनी रूग्णवाहिकेसह गावात गेले होते. मात्र त्यावेळी तथाकथित समाजसेवक निलेश सांबरे यांनी आपणच कसे गरिबांची कैवारी आहोत अशा आविर्भावात सदर महिलेला त्यांच्या समर्थकांमार्फत झडपोली येथील रूग्णालयात दाखल करून तिच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी आपण घेत असल्याचे समाज मध्यामांवरून जाहीर केले.

म्हणजे श्रेय लाटण्यासाठी सांबरे यांनी पीडित महीलेच्या उपचाराची जबाबदारी घेणाऱ्या आदिवासी विकास विभाग आणि तहसीलदार यांना सदर महिला आमच्याच रुग्णालयात उपचार घेण्यास तयार असल्याचे सांगून परावृत्त केले आणि काही दिवस उपचार करून परत त्या महिलेला मरण यातना भोगण्यासाठी तिच्या घरी सोडले. त्यामुळे गावातील विहीर नूतनीकरणाचे काम अर्धवट सोडून दिलेला कंत्राटदार आली असगर इंदुरिवाला,

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र दुधे, वाडा पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री. पी.एस. कुलकर्णी यांच्यासह नीलेश सांबरे हे सर्व तितकेच जबाबदार असल्याने सर्वांविरोधात भा.द.वि.कलम ३०४ अ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने वाडा पोलिसांना लेखी निवेदन देऊन केली आहे.

ज्या विहिरीचे नूतनीकरणाचे काम घेतले होते ते नियोजित वेळेत पूर्ण झाले असते, तर गावकऱ्यांवर दुसऱ्या विहिरीत तळाशी उतरून पाणी काढण्याची जीवघेणी कसरत करण्याची वेळ आली नसती आणि हा अपघात देखील झाला नसता असे स्थानिकांचे मत आहे. तर दुसरीकडे राहीबाई यांच्या उपचाराची आदिवासी विकास विभाग आणि तहसीलदार जबाबदारी घेत असताना देखील आपणच गोरगरिबांचे कैवारी आहोत असे आव आणणारे निलेश सांबरे यांनी सदर महिलेला आपल्या रुग्णालयात दाखल करून अर्धवट उपचार करून तिला परत घरी सोडून दिले. त्यामुळे या सर्वांवर भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश रेंजड यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here