जन विकास च्या पाठपुराव्याचे यश,वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील कामगारांचे थकीत वेतन मिळणार…

चंद्रपुर – राकेश दुर्गे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांना मागील सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नव्हते.याबाबत वारंवार पत्रव्यवहार व मागणी केल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे केवळ दोन महिन्यांचे वेतन टाकण्यात आले होते.यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी 14 ऑगस्ट रोजी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते.

या आंदोलनाची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी 16 ऑगस्ट रोजी कामगाराच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले व थकित पगार देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.पालकमंत्री यांच्या आश्वासना नंतर जन विकास कामगार संघाने काम बंद आंदोलन स्थगित केले होते.

अखेर दिनांक ४ सप्टेंबर रोजी जिल्हा कोषागार कार्यालयातून कामगारांच्या पगाराची बिले मंजूर करण्यात आली व मंजूर झालेली बिले वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त सुद्धा झाली.त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात सर्व कामगारांच्या खात्यामध्ये पगार जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोणीही कंत्राटदार नसल्याने वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे थेट कामगारांच्या खात्यात पगार जमा करण्यात येत आहेत. अनेकदा निधी उपलब्ध नसल्याने कामगारांना वेतन मिळत नाही तसेच पगाराची बिले जिल्हा कोषागार कार्यालयात पाठवितांना वारंवार त्रुटीपूर्ण बिले वैद्यकीय महाविद्यालयातर्फे पाठविण्यात येतात.

अशा अनेक कारणांमुळे कामगारांना हक्काच्या नियमित पगारापासून वंचित राहावे लागते.याबाबत जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात पदाधिकारी सतीश येसांबरे, कांचन चिंचेकर,ज्योती कांबळे,शेवंता भालेराव,अमोल घोडमारे,सतीश घोडमारे,नीलिमा वनकर राकेश मस्कावार, सुनिता रामटेके इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सतत पाठपुरावा केला.

कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसल्या नंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातले व कामगारांच्या पगाराचा प्रश्न निकाली काढला.शासनाच्या अनेक विभागांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना दर महिन्याला ठरलेल्या तारखेला किमान वेतनाच्या नियमानुसार पगार-भत्ते व सुट्ट्या मिळत नाही.

कंत्राटदार व शासकीय अधिकारी-कर्मचारी कंत्राटी कामगारांवर मनमानी करतात. शासकिय विभागातील सर्व पीडित कंत्राटी कामगारांना १० तारखेच्या आत नियमानुसार वेतन-भत्ते व इतर सुविधा मिळवून देण्यासाठी जन विकास कामगार संघाचा संघर्ष सुरू राहील अशी माहिती अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here