परभणी | सेलूच्या त्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानी मागितली दोन कोटीची लाच…

परभणी – विलास बारहाते

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल व पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण या दोघांनी एका तक्रारदार यांच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितली,तडजोडीअंती एक कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली. त्यापोटी दहा लाख रुपयांची लाजेची रक्कम स्वीकारली असे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान या दोघांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत माहिती अशी तक्रारकर्ता त्यांच्या मित्राचा अपघाती मृत्यू झालेला होता. तीन मे 2019 रोजी सेलू पोलीस ठाण्यात त्यानुषंगाने गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील मयत याचे पत्नी सोबत तक्रारकर्ता यांचे झालेले मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले, तेव्हा 9 जुलै 2021 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी पाल यांनी तक्रारकर्ता यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून तुझी व्हायरल झालेली क्लिप मी ऐकली असून त्यातून तुला बाहेर पडावयाचे असेल तर मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील असे सुनावले.

या तक्रारकर्ता यास वारंवार फोन करून अर्वाच्य शिवीगाळ केली. तसेच दोन कोटी रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याने या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे 22 जुलै रोजी प्रत्यक्ष येऊन लेखी तक्रार दिली.त्या तक्रारीच्या आधारे मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने 23 जुलै रोजी पडताळणी केली, तेव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी पाल यांनी दोन कोटी रुपयांची मागणी करीत तडजोडीत एक कोटी 50 लाख रुपये इतकी रक्कम मागितली.

त्यापाठोपाठ या विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाई दरम्यान पोलीस नाईक चव्हाण याने तक्रारकर्त्याच्या भावाकडून त्यापोटी दहा लाख रुपयांची लाजेची रक्कम स्वीकारली. त्यास रंगेहात पकडण्यात आले.दरम्यान मुंबईच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईने पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here