सौंसरच्या गीताला आकाशझेपच्या प्रयत्नाने मिळाले जीवनदान…

रामटेक – राजु कापसे

मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर तालुक्यामधील मोहगाव येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय गीता किसना टेकाडे यांना १० जानेवारीला आयजीजीएमसी, नागपूर येथे सर्जिकल कॉम्प्लेक्स मधील वार्ड ३९ मध्ये पोटातील तीव्र दुखण्यामुळे भरती करण्यात आले.

तपासणी दरम्यान तिच्या गर्भाशया शेजारी अंडाशयातील भागात कॅन्सरची गाठ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार असून या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार असा सल्ला त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना देत रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले. कुठली आर्थिक स्थिती नसतांना व नागपुरात कुणीही ओळखीचे नसल्याने गीताचे पती किसना टेकाडे व नातेवाईक यांना रक्ताची व्यवस्था कुठून व कशी करायची ?

असा यक्षप्रश्न पडला. सुदैवाने यावेळी वॉर्डमध्ये शिंगारदीप (बोरी) चे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ता अशोक टोहने यांची बहीण सायत्रा मेश्राम भरती असल्याने आणि त्यांना आकाशझेपच्या माध्यमातून मेयो रक्तपेढीच्या सौजन्याने तीन युनिट निःशुल्क रक्तपुरवठा करण्यात आला हे माहीत असल्याने ते अशोक टोहने यांचेकडे मदतीसाठी गयावया करू लागले.

माणुसकीचं नातं जपून आकाशझेपने मागील सात वर्षांच्या काळात हजारो गोर गरीब रुग्णांचे जीवन वाचविल्याचे प्रत्यक्षदर्शी असल्याने अशोक टोहने यांनी आकाशझेपचे संस्थापक सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांना याबाबत माहिती दिली.

प्रस्तुत प्रकरणाची दखल घेत कडबे यांनी लगेचच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (आयजीजीएमसी) नागपूर येथील  समाजसेवा अधिक्षक चेतन मेश्राम यांचेशी संपर्क साधून रक्तपुरवठा करण्याची विनंती केली. कर्तव्यदक्ष मेयो रक्तपेढीच्या वैद्यकीय चमूने वॉर्ड डॉक्टरांच्या मागणीनुसार Orh+ve १२ युनिट निःशुल्क रक्तपुरवठा पुरवठा केल्याने गीताला जीवनदान मिळाले.

त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासणी व चाचण्यानंतर १४ जानेवारीला त्यांच्यावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली. साक्षोधन कडबे यांनी १७ जानेवारीला गीताची भेट घेऊन सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. या दरम्यान कडबे हे सतत अशोक टोहने व डॉक्टर चेतन यांच्या संपर्कात राहून सहकार्य करत होते.

या सत्कार्याच्या यशस्वितेसाठी आकाशझेप तर्फे गीताच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत रक्तपेढीतील संपूर्ण चमूचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कडबे यांनी आयजीजीएमसी रक्तपेढीचे प्रभारी डॉ. प्रदीप बुटले चेतन मेश्राम, बीटीओ डॉ. सय्यद वसीम, डॉ. सागर गवई, डॉ. पल्लवी कुमरे, वंदना भगत आणि रक्तपेढी टीमचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here