पुण्यात भारत सासणे यांच्या हस्ते होणार मराठी संशोधन पत्रिका अमृतमहोत्सव विशेषांकाचे प्रकाशन..!

मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष डॉ राजा दीक्षित व  आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचा सत्कार! शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे (१२५) वाटचाल करणाऱ्या आणि *महाराष्ट्राचा मानबिंदूुं  असणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया चे मराठी संशोधन मंडळ दि १ फेब्रुवारी २०२२ रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे ! 

मंडळाच्या अमृतमहोत्सवानिमित्त मराठी संशोधन पत्रिके चा विशेषांक तयार करण्यात आला आहे!  यात मराठी संशोधन मंडळाच्या  ७४-७५ वर्षांतील प्रतिष्ठित, मौलिक, अनन्य अशा काही निवडक ग्रंथांच्या प्रकाशन कार्याचा, त्यातील विचारवैशिष्टयांचा,संशोधन कार्याच्या लेखनप्रकाशनांचा  नामवंतांनी घेतलेला  वेधक व वेचक आढावा सादर केला आहे !

सी. डी. देशमुख, प्रा. कृ .पां.कुलकर्णी, प्रा म.वा. धोंड, नामदार बा. गं.  खेर ,प्रा. न. र. फाटक, पंडित बाळाचार्य मा. खुपेरकर , डॉ.वि.बा. प्रभुदेसाई ,डॉ. स. गं. मालशे, धनंजय कीर ,बा. ना. मुंडी, डॉ. सु.रा. चुनेकर ,डॉ.स.लं. कात्रे ,गं. दे. खानोलकर, प्रा. रमेश तेंडुलकर ,आनंद रामकृष्ण नाडकर्णी, डॉ. के. बा.आपटे, प्रा.वसंत दावतर ,प्रा.दीपक घारे ,डॉ. प्रदीप कर्णिकआदींच्या लेखांचा विशेष उल्लेख  करावा लागेल,या विशेषांकाचे  प्रकाशन साधना साप्ताहिक कार्यालयात श्री.भारत सासणे यांच्या हस्ते दुपारी १२ ‌वाजता होणार आहे.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय व मराठी संशोधन मंडळ मुंबई , यांच्या वतीने *मराठी विश्वकोशा चे अध्यक्ष डॉ राजा दीक्षित यांच्या हस्ते   भारत सासणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच विश्वकोश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ राजा दीक्षित यांचाही सत्कार करण्यात येणार आहे .

साप्ताहिक साधनाचे  संपादक विनोद शिरसाट , मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कर्णिक व कार्याध्यक्ष शीतल करदेकर, मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ अनुवादक  चंद्रकांत भोंजाळ, यांच्या उपस्थितीत हा सोहळा अनौपचारिकरीत्या  संपन्न होणार आहे .

हा अमूल्य विशेषांक प्रत्येक मराठी अभ्यासक व मराठी भाषा जतन ,संवर्धन करणाऱ्या संस्था व  ग्रंथसंग्रहालयांनी आपल्या संग्रही ठेवावा  असे आवाहन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here