आठवडाभरात नाभिक समाजाचा प्रश्न सोडविणार…विजय वडेट्टीवार

गडचिरोली:
टाळेबंदीमुळे सलून व पार्लर बंद असल्याने नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, लवकरच सलून व पार्लर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथील पत्रकार परिषदेत दिली.


श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले की, व्यवसाय बुडाल्याने राज्यभरातील नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व सलून व पार्लर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. यासंदर्भात येत्या आठवडाभरात सरकार निर्णय घेणार आहे. परंतु सलून सुरु झाल्यानंतर सामाजिक अंतर व अन्य अटींचे पालन करावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता मंगल कार्यालयात ५० वऱ्हाडी व ५ वाजंत्री यांच्या उपस्थितीत लग्न लावता येणार आहे. मात्र, मंगल कार्यालयात वातानुकुलीत यंत्रणा बंद करावी लागेल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.


याशिवाय केंद्र सरकारच्या निर्देशानंतर रेड झोन सोडून उर्वरित भागात आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्याबाबतच सरकार विचार करीत असल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकेने अत्यल्प पीक कर्ज वाटप केल्याबद्दल श्री.वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. १ लाख २० हजार खातेदारांपैकी केवळ १२ हजार ४८९ खातेदार शेतकऱ्यांनाच बँकांनी पीक कर्ज वाटप केले, असे त्यांनी सांगितले.

सर्व गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेच पाहिजे, अशी सरकारची भूमिका असून, लवकरच आयुक्तस्तरावर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही श्री.वडेट्टीवार यांनी दिली.


गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालयाला ऑगस्ट महिन्यापर्यंत परवानगी मिळेल आणि ते पुढील सत्रात सुरु होईल. शिवाय अत्याधुनिक प्रयोगशाळाही सुरु होणार असून, त्याद्वारे कोरोना व अन्य रोगांचे निदान होऊ शकेल. गोंडवाना विद्यापीठाच्या जागेचा प्रश्न न सुटल्याने या विद्यापीठाला सेमाना देवस्थानजवळची वनविभागाची ४० हेक्टर(शंभर एकर) जागा व सेमानाच्या समोरील ४० एकर जागा विमानतळासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

अहेरी व गडचिरोली येथे प्रत्येकी एक अभ्यासिका निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करुन जागा उपलब्ध करुन देण्याविषयी आदिवासी विकास विभागाला निर्देश दिल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सद्य:स्थितीची कोरोनाविषयक माहिती देऊन प्रशासन व जनतेच्या सहकार्यामुळेच येथील मृत्यूदर अत्यल्प असून, स्थिती आटोक्यात असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, हरिराम वरखडे, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here