वांद्री धरणाच्या कालव्यांच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाबाबत मनसे आक्रमक…जि.प.उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनवर कारवाईची मागणी…

पोल-खोल भाग १

नावेद शेख,पालघर प्रतिनिधी / दिनांक ४ सप्टेंबर

वांद्री धरण निर्मितीच्या पस्तीस वर्षांनंतर निधी उपलब्ध झाल्याने पाटबंधारे विभागाकडून वांद्री धरणाच्या कालव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम पूर्ण होण्याअगोदरच कंत्राटदारांच्या बोगस कामामुळे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. वांद्री धरणाच्या उजव्या कालव्याचे सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत काँक्रीटीकरण करण्या करण्याच्या कामाचा ठेका पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनने घेतला असून मार्च महिन्यात काम सुरू करण्यात आले होते.

परंतु अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ऑगस्ट महिन्यात डाव्या कालव्याची 35 मीटर लांबीची भिंत कोसळली होती. स्थानिक शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून कालव्याच्या काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप केला होता. दरम्यान वांद्री धरणाच्या कालव्यांच्या निकृष्ट कामाबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी (ता.03) मनसेच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. कालव्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम करणाऱ्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनवर कारवाईची करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

वांद्री धरणाचा आठ किलोमीटर अंतराचा उजवा कालवा आणि त्यावरील सर्व लघुपाट तसेच डाव्या कालव्यावरील गुंदावे गावच्या हद्दीपर्यंतचे लघुपाट दुरुस्तीची जवळपास 8 कोटी रुपयांच्या 26 कामांची निविदा पाटबंधारे विभागामार्फत काढण्यात आली होती. या कामांपैकी सर्वाधिक 13 कामे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या जिजाई कन्स्ट्रक्शनने मिळवली आहेत. ती देखील तब्बल 25 टक्के कमी दराने.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस डाव्या कालव्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. कामाच्या सुरुवातीपासून कामाच्या दर्जाबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता.पावसाळा सुरू होईपर्यंत डाव्या कालव्यासाज तीन किलोमीटर अंतरापर्यंत काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले होते.क्यूरिंग कालावधीत काँक्रीटच्या भिंतीवर पाणी शिंपडण्यात आले नसल्याने कालव्याच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेले होते.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी घेतलेला आक्षेप खरा ठरला.डाव्या कालव्याची सुमारे पन्नास मीटर लांबीची भिंत जमीनदोस्त झाली. काँक्रीटीकरणाच्या कामाच्या तीन महिन्यात कालव्याची भिंत पडतेचा कशी?असा सवाल उपस्थित करून पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना हाताशी धरुन ठेकेदार निलेश सांबरे यांनी अतिनिकृष्ट दर्जाचे काँक्रीटीकरण केले असल्याचा आरोप मनसेचे भावेश चुरी यांनी केला. त्यामुळे जिजाऊ कन्स्ट्रक्शन वर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची मागणीही केली.

निकृष्ठ दर्जाचे काम करून कालवे हे शेतकरी पाणी वापर संस्थांना हस्तांतरित करण्याचा डाव असून मनसे ठेकेदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा मनसेने दिला आहे. त्यामुळे एरवी सोज्वलपणाचा टेंभा मिळवणाऱ्या आणि इतरांवर भ्रष्टाचराचे आरोप करणाऱ्या सांबरे यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन वर पाटबंधारे विभाग कोणती कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वांद्री धरणाच्या आणि कालव्यांच्या सर्व कामाच्या दर्जाची तपासणी करावी.निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाकडून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रवी पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात मनसे तालुका अध्यक्ष मंगेश घरत, पालघर शहर अध्यक्ष सुनील राऊत,मंगेश बोरकर, गणेश घोलप, नितीन घोलप,नित्यानंद पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here