मित्रच निघाला मुळ सुत्रधार…देवलापार येथील जबरी चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…

दिनांक १६ जुलै रोजी सायंकाळचे सुमारास फिर्यादी नामे अमित बालाजी नागपुरे ,रा.शनीवार वार्ड , रामटेक हे त्यांचे मित्र अश्विन उके व सोनु सोनावने यांचे सोबत मोटर सायकलने चोरबाहुली मार्गे हिवरा बाजारला येत असतांना चोरबाहुली गावाचे अगोदर एनएच ४४ महामार्गाने जात असतांना एक अनोळखी सडपातळ बांध्याचा इसम वय अंदाजे ३५ वर्ष लाल रंगाचे चौकडीचे शर्ट घातलेला व तोंडावर लाल रंगाचा स्कार्फ बांधलेला काळया रंगाचे पल्सर गाडीने फिर्यादीच्या गाडीच्या समोर चाकु घेवुन लुटमार करण्याच्या इराद्याने येवुन फिर्यादीच्या पार्श्वभागावर घाव मारून जखमी करून फिर्यादीचे खिशातुन नगदी ३०हजार रूपये जबरीने हिसकावुन नेल्याचे फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन देवलापार येथे अप.क. १२४/२१ कलम ३९४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

काल शनिवार दिनांक ३१ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपुर ग्रामिण हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना वरिल गुन्हयातील जखमी ( फिर्यादी ) यांचे सोबत घटनेवेळी सोबत असलेला त्याचा मित्र नामे अश्विन नरेंद्र उके , वय २७ वर्ष,रा. जाम ता . मोहाडी जि . भंडारा.ह.मु. c/o हसमुख पटेल , लाल दिवानशाह दर्गा मागे,बायपास रोड , ता . रामटेक , जि . नागपुर यास संशयावरुन ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाचे घटने बाबत विचारपुस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.त्यास विश्वासात घेवुन पथकास असलेल्या संशयाचे आधारे त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने सांगीतले की , सदर गुन्हयातील जखमी ( फिर्यादी ) नामे अमित नागपुरे , रा.रामटेक हा त्याचा चांगला मित्र असुन त्याने त्याचे कडुन काही महिने अगोदर १ लाख १४ हजार रुपये उधार घेतले होते व ते पैसे वेळेत परत न केल्याने अमित नागपुरे याने त्याच्याकडे पैशाची मागणी करीता रोज तगादा लावायचा .त्यामुळे आरोपी अश्विन उके याच्या मनात अमित नागपुरे बद्दल व्देष निर्माण झाला.

अमित नागपुरे हा लॉज व्यवसायीक असल्याने त्याचे जवळ नेहमी मोठी रक्कम असल्याचे त्याला माहीत होते. त्याने यातुन मार्ग काढणे करीता त्याचा मित्र नामे विक्की मोरसिंग बोडे( २२) रा.वार्ड क.२ ,कन्हान पिपरी , ता .पारशिवनी ,जि.नागपुर याचे मदतीने अमित नागपुरे यास मारहाण करुन लुटमार करण्याची योजना आखली.
त्यावरून दिनांक १६ जुलै रोजी सायंकाळी ०५.१५ वाजताच्या सुमारास आरोपी नामे अश्विन उके याने त्याच्या ताब्यातील होंडा कंपनिचे लिओ मोटर सायकल क्रमांक एम एच-४०/बी बी-६०३२ यागाडीवर मध्यभागी अमित नागपूरे व मागे सोनु सोनावणे यास बसवुन उधार घेतलेले पैसे परत करतो असे सांगुन विश्वासात घेवुन पवनी येथे जाण्याचे ठरले.

असे ठरल्याप्रमाणे आरोपी अश्विन उके त्याने विक्की बोडे यास माहीती दिली व ठरल्या प्रमाणे चोरबाहुली शिवारातुन रोडने जात असतांना आरोपी विक्की बोडे हा बजाज पल्सर मोटारसायकल ने मागुन आला व त्याने आरोपी अश्विन उके चालवित असलेली मोटारसायकल थांबविली व लगेच गाडी खाली उतरून आरोपी अश्विन उकेच्या गाडीवर मध्यभागी बसलेला इसम नामे अमित नागपुरे यास धारधार शस्त्राने वार करुन त्याच्या जवळील नगदी ३० हजार रुपये जबरीने हिसकावून घेतले.

तेव्हा आरोपी अश्विन उके याने ठरल्याप्रमाणे त्याच्या ताब्यातील गाडी घेवुन घटनेच्या ठिकाणाहुन पळुन गेला.व काही वेळाने जखमी नामे अमित नागपूरे यास संशय येवु नये म्हणुन परत घटनेच्या ठिकाणी येवुन त्यास दवाखान्यात घेवुन गेल्याचे सांगुन सदर ची घटना ही ठरल्याप्रमाणे आरोपी अश्विन उके याने आरोपी नामे विक्की बोडे याच्या हस्ते करविण्यात आली असल्याचे सांगीतले .

आरोपी नामे अश्विन उके याने दिलेल्या माहिती वरुन आरोपी नामे विक्की बोडे यास पो.स्टे.कन्हान परिसरातुन पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्याने सुध्दा अश्विन उके याचे सांगणे प्रमाणे गुन्हा केल्याचे सांगुन आरोपी अश्विन उके यास सदर घटनेमध्ये मदत केल्याबद्दल आरोपी विक्की बोंडे यास २०हजार रुपये मिळाल्याचे सांगीतले . वरिल नमुद दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन देवलापार यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोस्टे देवलापार करीत आहे .

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला नागपुर ग्रामीण ,अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर , यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिटटावार , सपोनि राजीव कर्मलवार , जितेंद्र वैरागडे , पोहवा नाना राउत , पोशि विपीन गायधने , रोहन डाखोरे ,अमोल वाघ,चालक अमोल कुथे व सायबर सेल चे सतिष राठोड यांनी पार पाडली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here