पुण्यात ‘मिशन झिरो’ उपक्रम ठरतोय प्रभावी…

भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, पुणे महापालिकेचा संयुक्त उपक्रम.

पुणे – अनलॉकनंतर पुणे जिल्हा आणि शहर देशातील ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनले होते. येथे रुग्ण वाढीचा वेग देशात सर्वाधिक झाला होता. गेल्या आठवड्यापासून पुण्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग घटला असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात राबविलेला ‘मिशन झिरो’ उपक्रम प्रभावी ठरत आहे.

देशातील हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव आणि धारावीत कोरोनाला रोखण्यात ‘मिशन झिरो’ यशस्वी ठरला होता. पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि महापालिकेतर्फे ‘मिशन झिरो पुणे’ उपक्रम राबविला जातोय. २३ जुलैपासून शहरातील ११ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उपक्रमाला सुरुवात झाली.

बीजेएसच्या टीमला २ ऑक्टोबरपर्यंत २७३६१ रॅपिड ऍन्टीजेन टेस्टद्वारे ५५९९ रुग्ण शोधण्यात यश आले. यामुळे हॉटस्पॉटमध्ये कोरोना प्रसार कमी होण्यास मदत झाली. शहरात सध्या नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची सख्या दररोज वाढत आहे.

शहरातील हॉटस्पॉटमध्ये ठरलेल्या भागात जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासण्या करून रुग्ण शोधणे, रॅपिड ऍक्शन प्लॅन तयार करणे, फिरत्या दवाखाण्यांची संख्या वाढविणे, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करणे, रिपोर्ट लवकर उपलब्ध करून देणे आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार या सूत्रांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हा उपक्रम यशस्वी ठरत आहे.

उपक्रमाबाबत बोलतांना भारतीय जैन संघटनेचे संथापक-अध्यक्ष शांतिलाल मुथ्था म्हणाले, “गेल्या ३५ वर्षांपासून देशातील प्रत्येक आपत्तीकाळात काम करण्याचा अनुभव भारतीय जैन संघटनेकडे आहे. कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक असलेल्या मालेगाव, धारावीत मिशन झिरो उपक्रम यशस्वी ठरला.

त्यामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात महापालिका आणि फोर्स मोटर्ससोबत हा उपक्रम राबविला जातोय. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वांची मेहनत आणि पालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी व पुणेकरांच्या सहकार्यामुळे परिणाम दिसून येत आहेत. पण सर्वांनी गाफील न राहता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी या पुढेही एकत्रित प्रयत्न करावेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here