डहाणू – जितेंद्र पाटील
मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धुंदलवाडी (आंबोली) येथे हॉटेल आकाशमध्ये तीन अज्ञातांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून 1 लाख 10 हजार रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे लुटीदरम्यान, हॉटेल मालक आणि काही कामगारांनी तसेच काही उभ्या असलेल्या ट्रक चालकांनी विरोध केल्यानंतर लुटारुंनी त्यांच्यावर रिव्हॉल्वरने तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. मात्र, गोळीबार करुन आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.
हॉटेलवरील दरोड्याची ही घटना मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली. घटनेनंतर पालघर पोलीस अधीक्षक तसेच कासा, तलासरी, घोलवड पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी आजूबाजूच्या जंगलात या दरोडेखोरांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
बुधवारी (30 सप्टेंबर) रात्री तीन जण हुंदाई आय 10 कारने हॉटेल आकाशमध्ये आले होते. त्यांनी अगोदर येऊन पाहणी केली आणि ते निघून गेले. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री हॉटेलमध्ये येऊन त्यांनी कॅशिअरकडून पैसे लुटले. पैसे लुटून पळत असल्याने मालक आणि काही कामगारांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही.
मालक आणि काही कामगारांनी दरोडेखोर ज्या गाडीतून पलायन करण्याचा प्रयत्न करत होते त्यावर शक्य होईल तसा मिळेल त्या वस्तूने हल्ला चढवत विरोध केला. हॉटेल मालक आणि कामगारांना गाडीची चावीही काढून घेण्यात यश आलं.
यानंतर दरोडेखोरांनी गाडी सोडून पलायन केलं. यामध्ये गाडीचेही मोठे नुकसान झाले. पोलिसांनी गोळीबारातील दोन गोळ्या हस्तगत केल्या आहेत. अज्ञात लुटारुंचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.लुटारू चोर जंगलात पळून गेले असून ते चिंचले येथील जंगलात असावेत त्यामुळे पोलिस तेथे तपास करीत आहेत.