मातेच्या कवेत लेकरांचा संसार झाला उद्ध्वस्त…महापूराने ग्रामस्थांच्या डोळ्यात तरळले अश्रू…

पूर ओसरला मात्र आठवणी जन्मभरासाठी काळजात साठवले

प्रशांत देसाई
महाव्हॉईस
भंडारा

भंडारा जिल्ह्यातुन वाहणाऱ्या वैनगंगा नदीला जीवनदायिनी म्हणून संबोधल्या जाते, अर्थातच तिला मातेचा दर्जा मिळाला आहे. वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे जणू मातेनेच आपल्या कवेत शेकडो गावांतील नागरिक, शेतजमीन घेत जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे अनेकांसाठी हा महापूर जन्मभरासाठी कटू आठवण ठरला आहे.डोळ्यादेखत स्वतःचा संसार उध्वस्त झाल्याचे बघून नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू आपोआपच वाट मोकळी करीत असल्याचे विदारक आणि काळीज हेलावणारे दृश्य जिल्ह्यात सर्वत्र बघायला मिळत आहे.

मध्यप्रदेशातील संजय सरोवर, पुजारीटोला आणि कालीसागर या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हे सर्व पाणी भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीत प्रवाहित झाले. मात्र, या पाण्याच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यावर महापुराचे संकट ओढवेल याची कुणालाही कल्पना नव्हती. बघता बघता क्षणार्धात अनेकांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेले पाणी अक्षरशः घरातील स्लॅपपर्यंत पोहोचले. या धावपळीत कुणालाही घरातील गृहपयोगी साहित्य काढण्याची संधीही मिळाली नाही. अंगावरील कपडे वगळता अन्य कुठलेही साहित्य त्यांना नेता आले नाही.

महापुरात शेतीसह शेकडो नागरिकांच्या घरादारांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे जनावरे, पशुपक्षी, गृहपोयोगी साहित्य वाहून गेलेत. राबराब राबून पिकविलेल्या शेतातील हातातोंडाशी आलेली पिकांची शेती पाण्याखाली गेल्याने मातीमोल झाली आहेत. एकट्या भंडाऱ्यातीलच नव्हे तर सत्तरच्यावर गावातील नागरिकांचा जीव या महापुरामुळे टांगणीला आला. घरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी प्रशासनाकडून वेळेत मदत मिळाली नाही, त्यामुळे नागरिक स्वतःच घरातून बाहेर पडत दुसऱ्यांकडे आश्रयाला गेले.

महापुरात अनेकांची घरे पूर्णतः पाण्याखाली आल्यानंतर प्रशासनाकडून नागरिकांना वाचविण्याची धडपड सुरू झाली. यासाठी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला पाचारण करण्यात आले. यांच्या माध्यमातून हजारोंना सुरक्षितस्थळी हलविले. मात्र, मागील चार दिवसात जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी महापुराचे जे भयावह क्षण अनुभवले ते प्रत्येकांच्या कायम स्मरणात राहणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here