कंपनी व्यवस्थापकाने भंगार मालाची केली अफराताफर…१९ लाख ६४ हजारांचा माल लांबवला; व्यवस्थापकावर गुन्हा दाखल… 

वाडा तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायत हद्दीतील ‘ जेराई फिटनेस ‘ या कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक योगेश उर्फ मोनू राय याने आपल्या पदाचा दुरूपयोग करून कंपनीतील काही टन लोखंडाच्या भंगार मालाची अफराताफर करून सुमारे 19 लाख 64 हजार रूपये किंमतीचा माल लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत व्यवस्थापकावर वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील घोणसई या गावाच्या हद्दीत ‘ जेराई फिटनेस प्रा.लि.’ ही कंपनी असून या कंपनीत व्यायामाच्या साहित्याचे उत्पादन केले जाते.या कंपनीत योगेश उर्फ मोनू राय हे उत्पादन व्यवस्थापक म्हणून गेली अनेक वर्षे काम पाहत होते.कंपनीतून निघणाऱ्या लोखंडाच्या भंगार मालाची विक्री करण्याचा अधिकार योगेश यांना कंपनी प्रशासनाने दिला होता.कंपनीत महिन्याला 15 ते 20 टन भंगार माल निघत असे.

एप्रिल 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत योगेशने केलेल्या काही टन भंगार मालाच्या विक्रीच्या पावत्या कंपनीत जमा केल्या होत्या मात्र त्याचे पैसे कंपनीत जमा केलेले नव्हते.एप्रिल 2018 रोजी 15 हजार 360 किलो लोखंडाचे तुकडे किंमत 3 लाख 68 हजार 640 रूपये,

एप्रिल 2018 रोजी 16 हजार 770 किलो लोखंडाचे तुकडे 4 लाख 2 हजार 480 रूपये किंमतीचे लोखंडी तुकडे व बुक्का असा एकूण सहा महिन्यांच्या मालाचे सुमारे 19 लाख 64 हजार 560 रूपये किंमतीचा भंगार माल लांबवून कंपनीची फसवणूक केली.कोरोना काळात कंपनीचे लेखा परिक्षण केल्यानंतर ही बाब उघडकीस आली असून कंपनीचे मालक राजेश राय यांनी थेट पोलिस ठाणे गाठून योगेश याच्यावर फिर्याद  दाखल केली. 

याबाबत वाडा पोलिस ठाण्यात भा.द.वि.कलम 408 अन्वये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास वाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर संख्ये करीत आहेत. योगेश राय फरारी असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here