‘जनता कर्फ्यू’ची हाक हे जिल्हा प्रशासनाचं अपयश : विजय मालोकार…

अकोला शहरात २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान पाच दिवसांच्या ‘जनता कर्फ्यू’ची हाक शहरातील व्यापारी संघटनांनी दिली आहे. अकोला जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या ७ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. आजपर्यंत २१५ रूग्णांना यात आपला जीव गमवावा लागला.

सध्या उपचार सुरू असलेल्या रूग्णांचा आकडा दोन हजारांकडे जातो आहे. मागच्या महिनाभरात जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार रूग्ण वाढलेत. तर ७० पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता परिस्थिती हाताबाहेर जात असतांना जिल्हा प्रशासन व्यापारी संघटनांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘जनता कर्फ्यू’च्या नावाखाली स्वत:चा नाकर्तेपणा लपवित असल्याचा आरोप शिवसेना नेते विजय मालोकार यांनी केला आहे.

आज अकोल्यातील व्यापारी संघटनांनी अकोला शहरात २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू पाळायचा निर्णय जाहीर केला. ‘जनता कर्फ्यू’ची पटकथा जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासोबतच ही परिस्थिती असंवेदनशीलपणे हाताळणाऱ्या त्यांच्या ‘किचन कॅबिनेट’ने लिहिल्याचा स्पष्ट आरोप मालोकार यांनी केला आहे. कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांना सरकारनं अमर्याद अधिकार दिलेत.

परंतू अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या काळात फक्त ‘कागदी घोडे’ नाचविल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोपही मालोकार यांनी केला आहे. ११ एप्रिलला पहिला रूग्ण सापडल्यापासून अकोला जिल्हा प्रशासन गोंधळलेल्या स्थितीत होतं. एकीकडे कडक ‘लॉकडाउन’चे निर्देश सरकारने दिले असतांना जिल्हा प्रशासनाने ‘चलता है’ची भूमिका घेत जिल्ह्यात कोरोनाला वाढण्यासाठी मोकळं मैदान करून दिल्याचंही मालोकार म्हणालेत.

अकोला जिल्हा रूग्णालयात रूग्णांना सुविधा आणि उपचार मिळण्यासाठी राज्यातील ‘महाविकास आघाडी’ सरकारनं वेळोवेळी संवेदनशीलपणे पाऊले उचललीत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अनेकवेळा बैठका घेत प्रश्न समजून घेत त्याची सोडवणूक करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केलेत. आरोग्यमंत्री राजेशजी टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेटी देत जिल्ह्यातील आरोग्य आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी वारंवार बैठका घेत लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, यात जिल्हा प्रशासन खरंच संवेदनशील होतं का?, असा सवाल विजय मालोकार यांनी केला आहे. आधीच्या सरकारमधल्या अन सध्या विरोधी पक्ष असणाऱ्या पक्षासाठी जिल्हा प्रशासन काम करतंय का?,

अशी शंका निर्माण होत असल्याचं मालोकार म्हणालेय. अकोल्याचं जिल्हा प्रशासन राज्यातील ‘महाविकास आघाडी’ सरकारची जनतेत बदनामी करण्यासाठीच पावले उचलत नसल्याचा आरोप मालोकार यांनी केला आहे.

व्यापारी संघटनांनी ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय घेतांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिंना विश्वासात घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, कोणत्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली याचं स्पष्टीकरण व्यापारी संघटनांनी द्यावं. जनतेच्या मागणीवरून केल्याचं सांगतांना जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचं आवाहन करणारे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचे व्हिडीओ संदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेत.

त्यामूळे हा ‘जनता कर्फ्यू’ जिल्हा प्रशासन प्रायोजित असल्यावर शिक्कामोर्तब होत असल्याचं मालोकार म्हणालेत. पुढे दिवाळीच्या काळातही अकोल्यात गर्दी वाढेल. मग दिवाळीच्या आधी दहा दिवससुद्धा व्यापारी संघटना असाच जनता कर्फ्यू लागू करण्यासाठी पुढाकार घेतील का?, असा सवाल विजय मालोकार यांनी केला आहे.

गेल्या सहा महिन्याच्या कोरोना आपत्ती काळात जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रशासनाच्या कामाचं ‘ऑडिट’ सरकारनं करावं, अशी मागणी मालोकार यांनी केली आहे. अकोला शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती चिघळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दोषी धरून त्यांची अकार्यकारी पदावर बदली करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचं विजय मालोकार यांनी स्पष्ट केलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here