महिलांच्या आशा आकांक्षाना वाव देणारा अर्थसंकल्प महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर…

धीरज घोलप

मुंबई, दि. 8: राज्यात गतवर्षी पहिल्यांदा लिंग आधारित अर्थसंकल्प (जेंडर बजेट) सादर करण्यात आला होता. यावर्षी त्याला व्यापक स्वरुप देत महिलांना केंद्रबिंदू मानून या अर्थसंकल्पाची आखणी करण्यात आली. जागतिक महिला दिनी जाहीर झालेला महिलांच्या आशा- आकांक्षाना वाव देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, आजचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने महिला केंद्रित आहे. अर्थसंकल्पात जाहीर झालेली ‘राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना’ ही राज्यातील महिलांचा सन्मान करणारी आहे. याअंतर्गत गृहखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये एक टक्क्याची सवलत ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने दमदार पाऊल आहे.

ग्रामीण विद्यार्थिंनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना’ जाहीर करण्यात आली असून याअंतर्गत शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मोठया शहरातील महिलांना प्रवासासाठी ‘तेजस्विनी योजनेत’ अधिकच्या विशेष महिला बस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

महिला व बाल सशक्तीकरणाच्या योजना राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत 3 टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचा निर्णय हा क्रांतीकारी ठरणार असून महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस कृतीकार्यक्रम यातून दिसून येत आहे. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गट स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे महिलांच्या शौर्याला सलाम करण्याचा निर्णय होय, असेही ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here