सुर्या नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह वीस तासानंतर आढळला….

मृतदेहाची शोधासाठी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण…

पालघर, ता.05
पालघर तालुक्यातील सुर्या नदी पात्रात पोहायला गेलेल्या तीन तरुणांपैकी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.04) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली होती. शुक्रवारी सायंकाळ पासून बुडालेल्या तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.वीस तासानंतर शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मृत तरुणाचा मृतदेह आढळून आला.

शुक्रवारी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबविण्यात आले होते.शनिवारी सकाळपासून बोईसर पोलीस आणि स्थानिकांकडून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.मृतदेहाचा शोध लागत नसल्याने शनिवारी दुपारनंतर वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान अडीच वाजताच्या सुमारास बुडालेल्या जागीच मृत तरुणाचा मृतदेह आढळून आला.त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शुक्रवारी सायंकाळी गुंदले गावच्या हद्दीत सुर्या नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी दोघे बंधाऱ्याच्या खालच्या भागातील पाण्यात पडले होते.यात एकाचा बुडून मृत्यू झाला होता,तर दुसऱ्या तरुणाला स्थानिकांनी बुडताना वाचवले होते.संजीत कनोजिया(वय.17)असे मृत तरुणाचे नाव होते. तो चिल्हार बोईसर रस्त्यावरील मान गावातील ओस्तवाल वंडर सिटीचा रहिवासी होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here