भ्रष्टाचाराची सर्वात मोठी झळ देशातील गरीब,कष्टकरी,आदिवासी व वंचित घटकांना…माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक – श्री.टी.के.चौधरी

ठाणे, २२ जून

माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक-श्री. टी.के.चौधरी यांनी पोलीस दलात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे या खात्याची प्रतिमा मलीन झाल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी अमेरिकेहून झूम अॅपद्वारे श्रमजीवी संघटनेच्या २०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते संघटनेच्या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य आणि पोलिसांची भूमिका याविषयावर ते बोलत होते. श्री. चौधरी पोलिस दलात रुजू होण्यापूर्वी भारतीय वायुदलात कार्य केले आहे. १९६५च्या युद्धात त्यांनी विशेष भूमिका बजावली आहे.

श्रमजीवी संघटनेने आयोजीत केलेल्या आठवड्याभराच्या शिबिराचे पहिल्या सत्राचे श्री. टी.के.चौधरी सरांनी काल सायंकाळी ६ वाजता उद्घाटन केल्यानंतर ते झूम अॅप द्वारे अमेरिकेतून संवाद साधत होते. त्याप्रसंगी त्यांनी पोलीस दलात आवश्यक बदल व स्वत: सेवेत असताना घडलेल्या अनेक घटनांचा त्यांनी उहापोह केला. त्यावेळी ते म्हणाले की पोलीसांची सद्याची प्रतिमा बदलण्याची नितांत आवश्यकता आहे आणि ती बदलणे आजच्या तरूण पोलीस अधिकाऱ्यांना शक्य आहे. असे आवाहनही त्यांनी केले.

संघटनेने आयोजित केलेल्या आठवड्याभराच्या प्रशिक्षण शिबीराच्या पहिल्या दिवशी सुमारे २०० पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. या शिबीरात भारतीय स्वातंत्र्य, संविधान, कायदा व सुव्यवस्था, पोलिस, आरोग्य व शिक्षण इत्यादी सर्व विषयांचा समावेश असेल.

श्री. चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की लोकशाही व्यवस्थेत पोलीस विभाग नागरिकांना संरक्षण देईल अशी अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली. पूर्वी पोलीस विभागात भ्रष्टाचार होता, पण आता त्याने उग्र रूप धारण केले आहे, महात्मा गांधी पासून सर्वच स्वातंत्र्य विरांना कल्याणकारी राज्य अपेक्षित होते; परंतु ते अस्तित्वात आले नाही. त्याचे मुख्य कारण आपली आजची पोलीस व्यवस्था व भ्रष्टाचार हे मूळ असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सध्याच्या काळात नागरिक राजकारण्यांकडे प्रश्न विचारू शकतात परंतु अधिकाऱ्यांकडे प्रश्न विचारायची कोणतीही सोय आज सामान्य नागरिकांना नाही. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.समाजातील केवळ धनदांडगे आणि शक्तीशाली लोकांसाठीच आत्तापर्यंत पोलीस दलाने काम केले; हे नाकारतां येणार नाही. पोलिसांनी समाजातील दुर्बल, वंचित घटकांना त्यांच्या न्याय मागण्यांना चिरडून टाकण्याचे काम आत्तापर्यंत केले. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

पोलीस सुधारणां कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी श्री. सोली सोराबजी आणि श्री. रिबेरो आयोगाच्या शिफारशी शासनाला स्विकाराव्या लागतील. असे झाले तर आणि तरच ज्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना गोरगरीबांसाठी काम करायचे आहे त्यांना बळ मिळेल. तसेच अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल. परंतु सोराबजी व रिबेरो आयोगाच्या शिफारशी स्विकारण्यास आज शासन तयार नाही, हे वास्तव आहे. त्यासाठी लागणारा निधी आज शासनाकडे नाही; असे सांगुन शासन त्याकडे आज दुर्लक्ष करीत आहे असे ते म्हणाले त्यांवर बोलताना विवेक भाऊंनी सांगितले की, भविष्यात या शिफारशी शासनाला स्विकाराव्याच लागतील आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करु.

पोलीस सुधारणा कायदा येण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जाणिव जागृती निर्माण करावी लागेल तसेच शासनावर दबाव वाढवावा लागेल. ज्या देशांमध्ये पोलीस विभागाचे काम उत्तम आहे. त्याची माहिती आपल्या जनतेला द्यावी लागेल असे त्यांनी सुचवले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, श्रमजीवी संघटना व विवेक भाऊंच्या संपर्कात आल्यामुळे समाजाकडे त्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला. तोपर्यंत मी आपले काम आणि आपण यापूर्ती मर्यादित राहिलो होतो मला समाजाशी विशेष देणेघेणे नव्हते हे आवर्जून त्यांनी सांगितले.

भारतीय संविधान लिखीत व तपशीलवार (Specific) असूनही ते घडले नाही; त्याचे मूळ राज्यघटनेत नसून येथील लोकांच्या संकुचीत व स्वार्थी वृत्तीत आहे. ही दुसरी खंत त्यांनी व्यक्त केली. बळी तो कान पिळी ही वृत्ती आज सर्वत्र दिसत आहे. त्यांवर मात करायची असेल तर संघटने शिवाय पर्याय नाही. हे दिसून येते. शासन व सत्ता तेव्हाच झूकते जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो वा तुमच्या सारख्या गोरगरीबांसाठी निर्माण झालेल्या संघटनेची ताकद असते.

भारतीय संविधानाला जगात तोड नाही असे असूनही देशातील सामंत शाहीमुळे, त्यांच्या संकुचीत वृत्तीमुळे देशात लोकशाही असूनही स्वातंत्र्याच्या ७३ वर्षात ती रुजलेली नाही ती कागदावरचं राहिली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे. मराठवाड्यातील नरबळी प्रकरण आजही न्यायासाठी प्रलंबित आहे. आणि ती खंत आज सरांनी मार्गदर्शन करताना शेवटी व्यक्त केली. यांवर संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांनी संघटनेमार्फत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरु असून या प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकैष्टा करु असे श्री. चौधरी यांना आश्वासन दिले.

झूम अॅपद्वारे २ तासाहून जास्त वेळ चाललेल्या या आॅन-लाईन शिबिराच्या पहिल्या सत्रात संघटनेचे संस्थापक श्री. विवेक पंडित यांनी मार्गदर्शक व सुविधाकार श्री टी. के. चौधरी यांचे स्वागत केले तर संघटनेच्या उपाध्यक्षा श्रीम. स्नेहा दुबे यांनी सत्राचे सुत्र संचालन केले. तसेच श्री. चौधरी यांच्या कार्याची प्रशिक्षणार्थींना ओळख करून दिली. अशा प्रकारे शिबिराच्या पहिल्या सत्राचा समारोप झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here