तिरोडा तहसीलदारांनी बोलावलेल्या सभेवर तालुका पत्रकार संघाचा बहिष्कार…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्ह्यातील तालुका तिरोड्याचे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी तहसील कार्यालयात 11 नोव्हेंबर रोजी पत्रकारांसाठी सभेचे आयोजन केले होते. ही सभा उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत होणार होती. मात्र पत्रकारांना योग्य वागणूक, सन्मानजनक व्यवहार व सहकार्य तहसीलदारांकडून मिळत नाही. त्यामुळे तिरोडा तालुका पत्रकार संघाने तहसीलदारांनी बोलावलेल्या सभेवरच (परिषद) बहिष्कार टाकला. तिरोड्याच्या इतिहासात प्रथमच ही घटना घडली आहे. 

सविस्तर असे की, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या 25 ऑक्टोबर 2021 व प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या 11 ऑक्टोबर 2021 च्या पत्रान्वये तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी सदर सभेचे आयोजन केले होते. त्यात ‘मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरूस्ती, नाव वगळणी, तसेच नवीन नोंदणी इत्यादि प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत पोहचावे, याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन’,

हे या सभेसाठी विषय होते. तिरोडा विधानसभा मतदार संघांतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये 16 नोव्हेंबर 2021 रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करणे व उपक्रम राबविण्याचे निर्देश प्रशासनाला वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत.

त्याअनुषंगाने तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी 11 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील केवळ 7 प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावले होते. मात्र तहसीलदार घोरुडे यांच्याकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कधीच सन्मानपूर्वक वागणूक व सहकार्य मिळत नाही. ही बाब लक्षात घेवून अख्ख्या तिरोडा तालुका पत्रकार संघाने या सभेवर बहिष्कार घातला. त्यामुळे कोणत्याही प्रसार माध्यमाचा प्रतिनिधी या सभेला उपस्थित राहिला नाही.

तहसीलदार घोरुडे यांच्याकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सन्मान व सहकार्य नसल्यामुळे तालुक्यातील सर्व पत्रकारांनी त्यांचा निषेध व्यक्त केला. उल्लेखनीय म्हणजे तिरोडा तालुका पत्रकार संघातील काही पत्रकारांनी सदर दिवसी थेट तहसील कार्यालयात जावून आपण बोलावलेल्या सभेवर आमचा बहिष्कार असल्याचे तहसीलदारांना सांगितले.

तालुका पत्रकार संघात प्रिंट, पोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. मात्र तहसीलदारांनी केवळ 7 प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून पत्रकार संघाचा अवमान केल्याने सर्वच पत्रकारांनी पाठ फिरवली. तिरोड्याच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या या घटनेची एकच चर्चा तालुक्यात रंगली असून हे वृत्त वार्‍यासारखे पसरत आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असून वरिष्ठ अधिकार्‍यांनी, जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदार घोरुडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तालुका पत्रकार संघाची आहे.   

पत्रकारांच्या मौलिक कार्याचे मूल्यांकनच नाही 

पत्रकारांनी कोविड-१९ विषाणूच्या कोरोना काळात अथक परिश्रम घेऊन वृत्तांकन, वृत्तसंकलन, वृत्तसंपादन ते प्रकाशनाचे कार्य केले. कोरोना काळात गरीब गरजूंना मदतीचा हात दिला. जीवनोपयोगी वस्तूही पुरविल्या. अनेक पत्रकारांना आपला जीवदेखील गमवावा लागला. प्रिंट मीडियावर देखील कोविड विषाणूच्या दुष्परिणामाचा तडाखा बसला. मात्र पत्रकारांच्या मौलिक कार्याचे मूल्यांकनच होत नाही. याची कसलीही दखल शासन-प्रशासन स्तरावर घेण्यात आली नाही.

तिरोडा तालुका पत्रकार संघाने शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना वर्षभर सहकार्य केले. शासनाची माहिती, परिपत्रक, शासन निर्णय, सूचना, आदेश, अनेक विषयावरील बातम्या जनतेपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य केले. मात्र त्याकडे कोणतेही लक्ष दिले गेले नाही. परिणामी नोंदणीकृत तालुका पत्रकार संघाने यावर्षी ‘जाहिरात नाही तर बातमी नाही’ अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाची लोकोपयोगी माहिती, प्रचार-प्रसार-प्रसिद्धी यावर अंकुश बसण्याची नामुस्की ओढवल्याचे दिसून येत आहे.

तिरोड्याच्या इतिहासात प्रथमच : शेतकर्‍यांच्या घरी बैलजोड्या पायदळ सोडून येणारे हेच ते तहसीलदार

शासनाच्या योजनेतून मिळालेल्या घरकुलाच्या बांधकामसाठी बैलबंडीने रेती वाहून नेणार्‍या शेतकर्‍यांच्या 3 बैलबंड्या तिरोडा तालुक्याचे विद्यमान तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी जप्त केले होते. एवढेच नव्हे तर त्या मुक्या जनावरांना, 6 बैलांना दिवसभर तहसील कार्यालयाच्या आवारात चार्‍यापाण्याविना बांधून ठेवले होते. बैलांचे मालक असलेल्या शेतकर्‍यांवर दंड ठोठावले होते.

कारवाई करण्याच्या नादात मुक्या जनावरांचे तहसीलदारांना भान राहिले नाही. त्या मुक्या बैलांना चारापाण्याविना-भुकेने ताटकळत राहावे लागले होते. मात्र तहसील कार्यालयात चारा-पाणी नसल्याचे लक्षात येताच अखेर दस्तुरखुद्द तहसीलदारांना बैलांना रस्त्याने हाकत त्यांच्या मालकांच्या घरी 3 किमीपर्यंत पायदळ नेवून द्यावे लागले. ही घटना सुद्धा तिरोड्याच्या इतिहासात प्रथमच घडली होती. हेच त्या बहूचर्चित प्रकरणातील तहसीलदार प्रशांत घोरुडे होत. त्यांना मुक्या जनावरांचे हित नाही तर माणसांचे, पत्रकारांचे काय राहणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here