सेल्फी काढणे जीवावर बेतले…तीन तरुणांना रेल्वेची धडक…दोघांचा जागीच मृत्यू…

न्यूज डेस्क – पश्चिम बंगालमधील मेदिनीपूरमध्ये सेल्फी काढीत असतांना दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला व तिसरा गंभीर जखमी झाला आहे. मेदिनीपूरमध्ये रेल्वे मार्गावर सेल्फी काढत असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये मिथुन खान (36) आणि अब्दुल गेन (32) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मेदिनीपूरच्या रंगमती परिसरात रेल्वे पुलाजवळ एक पिकनिक स्पॉट आहे. याठिकाणी तरुणांचा एक गट पिकनिकसाठी आला होता. सेल्फी घेण्यासाठी याच गटातील तीन तरुण रेल्वे ट्रॅकवर गेले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान मेदिनीपूर ते हावडा ही लोकल ट्रेन रुळावर आली. रेल्वे चालकाने वारंवार हॉर्न वाजवला, मात्र त्यानंतरही तरुण हलले नाही, त्यानंतर तिघेही ट्रेनच्या धडकेत आले आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे क्रॉसिंगवर फोटो काढण्यास मनाई आहे. असे असतानाही लोक त्याच्या जवळ येऊन अपघाताचे बळी ठरतात. दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

( कृपया – फोटो अथवा सेल्फी घेतांना सावध राहा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here