कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य दक्षता घ्या…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा याबाबींना प्राधान्य देण्यात आले आहे.

त्यामुळे या बाबींचा विचार करून शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच खाजगी शाळेचे मुख्याध्यापक यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, शिक्षणाधिकारी श्री. चवणे आदी उपस्थित होते.

शाळेमध्ये आरोग्याच्या दृष्टीने तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटर, हॅन्डवॉश, आत धुण्याचे पाणी आदींची सुविधा असणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, संपूर्ण शिक्षकांची चाचणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 40 टक्के शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत 60 टक्के शिक्षकांच्या चाचण्या दोन-तीन दिवसांत करण्यात येईल. लक्षणे किंवा को-मॉरबीड तसेच जास्त वयाचे शिक्षक असल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे अत्यावश्यक आहे.

इयत्ता 9 वी ते 12 पर्यंतच्या मुलांची शाळा सुरू होणार असून त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. ज्या पालकांनी संमती दिली आहे, त्यांना शिकविण्याची प्रकिया सुरू करावी.

ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुध्दा ठेवण्यात आला असून मुलांना एकत्र न बोलविता एका दिवसाआड शाळांमध्ये बोलवावे. शाळेतील टेबल, खुर्च्या सॅनिटाईज असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी एकमेकांचे साहित्य वापरू नये, यासंदर्भात शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करावे.

शाळेत मुलांनी घ्यावयाची काळजी याबाबत दहा ते बारा मुद्दे शाळेत आल्याबरोबर मुलांकडून वाचून घ्यावे. शाळेतील मुलांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन आदींबाबत अवगत करावे. तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी शाळेत धावणे, शारीरिक व्यायाम आदींचीसुध्दा सवय लावावी.

मात्र मुलांची कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. मुख्य म्हणजे शाळेतील विद्यार्थी किंवा शिक्षक प्रतिबंधित क्षेत्रातून येता कामा नये. याबाबतची माहिती तालुकास्तरीय यंत्रणेकडून शाळांना उपलब्ध करून दिली जाईल. शाळेतील शिक्षक किंवा विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता त्वरीत 07232-239515 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, अशाही सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

तर जिल्ह्यात जिल्हा परिषद, शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित 771 शाळा असून वर्गखोल्या 3855 आहे. एकूण शिक्षकांची संख्या 3397 आहे. इयत्ता 9 व 10 वी चे एकूण विद्यार्थी 89988 आणि 11 वी व 12 वी चे एकूण विद्यार्थी 59797 असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here