पोहण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, पिंडकापार परिसरातील बावनथडी जलाशयात घडली घटना…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना पिंडकापार परिसरातील बावनथडी जलाशयात काल शनिवारला सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. मृतकचे नाव बंटी राजू तांदूळकर ( २१) राहणार नवेगाव (बेलदा) असे आहे. बंटी हा त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांसोबत गावातीलच एका व्यक्तीला घेऊन काल शनिवारला दुपारच्या दरम्यान पिंडकापार शिवारातील बावनथडी जलाशयाच्या परिसरात फिरायला गेला होता.

जलाशय तुडुंब भरले असल्याने बंटीला पोहण्याची इच्छा झाली व तो एकटाच पाण्यात उतरला त्याला बऱ्यापैकी पोहता येत होते.याच नादात तो पाण्यात खोलवर गेला.तिथे पाण्याची खोली जास्त असल्यामुळे त्याचा अंदाज चुकला व तो गटांगळ्या खाऊ लागला. बंटी बुडत असल्याचे लक्षात आल्यावर काठावरील दोघांनी आरडाओरड केली. ही माहिती मिळाल्यावर जिल्हा परिषद सदस्या शांताताई कुंमरे,बेलदा ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश भांडारकर यांच्यासोबत गावातील नागरिकांनी घटनास्थळ गाठले.

नागरिकांच्या मदतीने बंटीचा पाण्यात शोध घेतला.काही वेळाने देवलापार पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बंटीचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला आणि देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी आणला. सदर प्रकरणी देवलापार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here