वीज पुरवठा खंडित करूनही बिल न भरणाऱ्या ग्राहकांची होणार ‘सरप्राईज चेकिंग’…

शुन्य ते तीस युनिट वीज वापरणारे ग्राहकही महावितरणच्या रडारवर

अमरावती – परिमंडळाअंतर्गत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील  अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊनही त्यांच्याकडून वीज बिलाचा भरणा केलेला नाही. अशा ग्राहकांवर महावितरणची नजर असून त्यांची तपासणी करण्यासाठी सरप्राईज चेकिंग करण्यात येत आहे. यासाठी महावितरण परिमंडळ कार्यालयांकडून विभागानुसार वेगवेगळी पथके कार्यरत केली आहेत.

लॉकडाउन मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरण कंपनीने एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात वीज बिल भरण्याचा कुठलाच तगादा लावला नाही. लॉकडाऊनचा फायदा घेत परिमंडळातील लघुदाब वर्गवारीतील अनेकांनी वीज बिल भरलेले नाही. परिमंडळाअंतर्गत अमरावती व  यवतमाळ जिल्ह्यातील घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तात्पुरता वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडे सुमारे ७७ कोटी रुपयांची थकीत रक्कम आहे.

ती भरणा न केल्याने या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यानंतरही ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केलेला नाही. वीज पुरवठा खंडीत आहे. बिल भरले नाही. वीजे शिवाय जगण्याची कल्पना करणे आजच्या घडीला शक्य नाही असे असतांना ग्राहक वीजेशिवाय कसे राहू शकतात. त्यामुळे अशा ग्राहकांची तपासणी करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. यासाठी सरप्राईज चेकिंग सुरू केली आहे.

महावितरणकडून वसूलीला जोरदार गती देण्यात आली असून थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. वाढलेल्या थकबाकीमुळे आर्थीक अडचणीचा सामाना करणाऱ्या महावितरणकडून वसूलीसाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे सरप्राईज चेकींग दरम्यान वीज ग्राहकांकडे वीज पुरवठा सुरू असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर वीज कायदा २००३ अंतर्गत वीज चोरीच्या विविध कलमान्वये फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

याशिवाय अनाधिकृत वीज देऊन शेजारधर्म पाळणाऱ्यांवरही विद्युत कायदाअंतर्गत वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.त्यामुळे शेजाऱ्यांनी आपण कायद्याचे उलंघंन तर करत नाही ना ? याची काळजी घेणे गरजेचे आहे.

याशिवाय परिमंडळातील ० ते ३० युनिट वीज बिल वापरणारे ग्राहकही महावितरणच्या रडारवर आले आहेत. त्या सर्व ग्राहकांची सरसकट तपासणी महावितरणच्या  पथकाकडून केली जाणार आहे. त्यामुळे वीज वापरात अनियमितता किंवा मीटरमध्ये फेरफार आदी प्रकार आढळल्यास वापर केलेल्या वीजेची दंडासह वसूली व वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे :- वीज बिल वसूली मोहिमेला परिमंडळात गती देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे.

याशिवाय ग्राहकांना आठवड्याच्या सातही दिवशी २४ तास सुरू असणारे मोबाईल एप व महावितरण संकेतस्थळावरून वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध असल्याने ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने अमरावती परिमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. जनसंपर्क अधिकारी महावितरण, अमरावती परिमंडळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here