तारसा येथील चक्काजाम आंदोलनाला यश…आंदोलकांच्या मागणीनुसार मौदा-रामटेक रस्ता दुरुस्तीकरिता झाली सुरुवात…

रामटेक – राजु कापसे

मौदा – रामटेक मुख्य रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांची व उखडलेल्या रस्त्याची अतिशीघ्र दुरुस्ती करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते रोशन मेश्राम आणि खंडाळा ग्रामपंचायत उपसरपंच संकेत झाडे यांच्या नेतृत्वाखाली व तारसा ग्रामपंचायत सरपंच आनंद लेंडे, ग्रामपंचायत चाचेर सरपंच महेश कलारे,

निसतखेडा सरपंच रजत महादूले, नवेगाव (आष्टी) सरपंच महेंद्र तांडेकर, नेरला उपसरपंच मनोज कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत काल उपविभागीय अधिकारी मौदा शाम मदनुरकर व तहसीलदार मौदा प्रशांत सांगडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देऊन चक्काजाम रास्तारोको आंदोलनाची परवानगीची मांगणी केली होती. त्याअनुषंगाने आज दिनांक १६/०९/२०२० ला तारसा जॉइन्ट येथे मुख्य रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

सद्यस्थितीत मौदा ते रामटेक या मुख्य रस्त्यावर खूप मोठं-मोठे जीवघेणे खड्डे पडलेले आहेत व काही भागातील हा मुख्य रस्ता अत्यंत खराब होऊन खूपच उखडलेला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कुंभकर्णी झोपेत असून या रस्त्याच्या दुरावस्थाकडे दुर्लक्ष करत आहेत. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत चिंताजनक आहे.

मौद्यापासून ते नंदापुरी गावापर्यंत जवळपास २० किलोमीटर पर्यंत या रस्त्याला सध्या जागोजागी खड्डे पडल्यामुळे मोठी दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता अशी अवस्था झाली आहे. वाहन चालकांना मात्र या रस्त्याने खुपचं कसरत करावी लागत आहे. मौदा ते नंदापुरी या २० किलोमीटरच्या अंतराच्या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ सुरू असते.

मौजा नंदापुरी पासून ते मौद्याकडे जाण्यास हाच मुख्य मार्ग असल्यामुळे ग्रामीण भागातून मौदा येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलिस स्टेशन व ग्रामीण रुग्णालयाकडे येण्यासही हाच मार्ग आहे. याच रस्त्यावर नेरला गावासमोर एका ठिकाणी पाईपलाईनसाठी रस्ता फोडण्यात आल्याने या ठिकाणी मोठे खड्डे तयार झालेले आहेत. या रस्त्याच्या परिसरातील रुग्णांना मौद्याला आणायचे असल्यास खराब रस्त्यामुळे मोठा त्रास होत आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर या रस्त्याला खड्डे पडले असून कोणता खड्डा चुकवून पुढे जायचे हा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. तालुक्यातील नंदापुरी, नेरला, चाचेर, निसतखेडा, खंडाळा(गांगणेर), आष्टी, नवेगाव, दुधाळा, खोपडी, तारसा, बाबदेव अशा अनेक गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे व वरील गावांतील नागरिक रोजच या रस्त्याने ये-जा करत असतात.

सदर रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांना खूपच कसरत करावी लागत आहे व कितीतरी नागरिकांचे या जीवघेण्या खड्डयांमुळे रोजच लहान-मोठे अपघात होत आहेत. या अपघातांमुळे काही नागरिकांना अपंगत्व सुध्दा प्राप्त झाले आहे, परंतु अजूनपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची कुंभकर्णी झोप उघडलेली नव्हती.

याच रस्त्याच्या नवेगाव रेल्वे गेटसमोरील मार्गावर खूपच मोठमोठे १ ते २ फुटांचे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या खड्डयात अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेही मत आंदोलकांनी व्यक्त केले.

सार्वजनिक बांधकाम विभाग मौदा येथील उपविभागीय अभियंत्याने मागील आठवड्यात माती टाकून हे खड्डे बुजवलेले होते परंतु ही माती जास्त काळ टिकणारी नव्हती त्यामुळे रोजच्या ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे हे खड्डे पुन्हा उखडून जसेच्या तसेच होत चालले आहेत.

याबाबत नागरिकांकडून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग मौदा येथील अभियंत्यांना पत्रे देऊनही अजूनपर्यंत डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजवलेले नव्हते. विशेष म्हणजे मौदा-रामटेक या मुख्य डांबरीकरण मार्गावरील खड्डे मातीने बुजवणे ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मौदा येथील अभियंत्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या थातुरमातुर दुरुस्तीने जनता समाधानी नव्हती.

त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रोशन मेश्राम व खंडाळा ग्रामपंचायत उपसरपंच संकेत झाडे यांनी आज तारसा जॉइंट येथे चक्काजाम रास्तारोको आंदोलन केले. चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी तारसाचे सरपंच आनंद लेंडे व नावेगावचे सरपंच महेंद्र तांडेकर, चाचेरचे सरपंच महेश कलारे व निसतखेड्याचे सरपंच रजत महादूले यांनीही महत्त्वाची भूमिका निभावली.

अखेर मौदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता संतोष खोब्रागडे आणि नायब तहसीलदार मौदा श्री. नांदेश्वरजी यांनी सदर चक्काजाम रास्तारोको आंदोलनाची दखल घेऊन सदर आंदोलनाला भेट दिली व आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करून आजपासूनच रास्तादुरुस्तीचे काम सुरू करत असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सर्व उपस्थित आंदोलकांनी आपले रास्तारोको आंदोलन समाप्त करत असल्याचे जाहीर करून आंदोलन समाप्त केले.

सदर चक्काजाम आंदोलनात रोशन मेश्राम व संकेत झाडे यांच्यासोबत आनंद लेंडे, महेश कलारे, महेंद्र तांडेकर, रजत महादूले, मनोज कडू, शेषराव देशमुख, आशिष मेहर, अज्जूभाई पठाण, मनोहर भिवगडे, सौरभ चोपकर, चांगदेव येळणे, अशोक पाटील, किशोर दुपारे, महेंद्र वैरागडे, आकाश नेवारे, राजेश गेडाम व शेकडो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here