अशोकराव चव्हाणांच्या प्रयत्नाला यश नांदेडला नर्सिंग कॉलेज मंजूर; १६ कोटी ९ लाखाचा निधी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

परिचारिकांची वाढती – आवश्यकता लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेडला शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात ‘नर्सिंग कॉलेज’ मंजूर झाले आहे. या निर्णयानुसार डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ५० प्रवेश क्षमतेचा बीएससी परिचर्या अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

या निर्णयासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व संपूर्ण मंत्रिमंडळाचा आभार मानले आहेत.
दोनच दिवसांपूर्वी डॉ. शंकरराव चव्हाण यांचा स्मृतिदिवस झाला.

या निर्णयातून एक प्रकारे त्यांना आदरांजली अर्पण झाली आहे. संपूर्ण जगात प्रशिक्षित वैद्यकीय मदतनिसांची मागणी वाढते आहे. त्यामुळे शासकीय परिचर्या महाविद्यालय म्हणजे रोजगाराची नवी संधी आहे. हे महाविद्यालय नांदेडला सुरू व्हावे, यादृष्टीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते.

त्यांच्या प्रयत्नास यश आले असून नवे महाविद्यालय सुरू करण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. सोबतच या महाविद्यालयासाठी आवश्यक पदनिर्मिती, यंत्रसामुग्री, फर्निचर, वाहन, पुस्तके आणि दैनंदिन आवर्ती खर्चासाठी १६ कोटी ९ लाख रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे नवे महाविद्यालय लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here