पातूर – निशांत गवई
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय वाल्मिकी समाजातील तरुणीवर त्याच गावातील उच्च जातीच्या तरुणांनी सामूहिक बलात्कार करून तिने आरोपीचे नाव सांगण्याची हिंमत करू नये म्हणून तिची जीभ देखील कापून काढली. तिच्यासोबत झालेल्या या भयावह, क्रूर, अमानुष बलात्कारामुळे आणि तिला वैद्यकीय उपचार मिळण्यास झालेल्या अडथळ्यांमुळे दि.३० सप्टेबर २०२० रोजी तिचा मृत्यू झाला.
काल तिचे प्रेत घरच्यांना सुपूर्द न करता पोलिसांनी परस्पर तिच्यावर अंतिम संस्कार केले. अंतिम संस्काराच्या पूर्वी घरच्यांनी विनवणी करूनही तिचे दर्शन घेऊ दिले नाही आणि अंतिम संस्कारांच्या वेळी घरच्यांना व प्रेसला अंधारात ठेवण्यात आले.
सुरुवातीला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास देखील पोलिस टाळाटाळ करत होते. या टाळाटाळी बद्दल सरकार विरोधात आवाज उठल्यानंतर खूप उशिरा गुन्हा दाखल केला. ही घटना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आणि पोलीस दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. या तरुणीला वेळेवर वैद्यकीय मदत देखील मिळाली नाही.
अन्यथा तिचा जीव वाचू शकला असता. क्रूर अमानुष अत्याचाराची ही घटना आंणि त्यानंतर संपूर्ण शासन व्यवस्थेने तिला मदत देण्यासाठी केलेले असहकार्य, संपूर्ण देशाला आणि भारतीय राज्य व्यवस्थेला लज्जास्पद अशी घटना आहे. वाल्मिकी सेना या शर्मनाक घटनेचा तीव्र निषेध करते. मनुस्मृतीच्या व्यवस्थेचा पगडा भारतीय समाजातील उच्चवर्णियांवर आजही कायम आहे त्यामुळे महिला आणि शूद्रातिशूद्रांच्या वरील अत्याचार वाढत चालले आहेत.
संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यास नकार देऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार व पोलिस संविधानाशी सातत्याने द्रोह करीत आहेत व मनुस्मृतीची व्यवस्था राबवत आहेत. या अमानुष घटनेची वाल्मिकीसेना निंदा करत आहे.
सदर प्रकरणातील दोषींवर व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणा-या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिनेश गवई यांच्या नेतृत्वखाली राणा उर्फ विष्णू डाबेराव, मदन खोडे, संजय खोडे, रमेश सारवाण, भारत खोडे, राहुल खोडे, सोनू चावरे यांनी तहसीलदाराला निवेदन देण्यात आले.