मुंबईतील २५ अनुदानित कॉलेज बंद पाडण्यापासून थांबवा !…राजेश शर्मांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी…

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर
मुंबईत सरकारी अनुदानप्राप्त जवळपास २५ शाळा, कॉलेज बंद करुन त्या जागांचा बेकायदेशीरपणे खाजगी कारणासाठी वापर करण्याचा डाव संस्थाचालकांनी आखला आहे. या शैक्षणिक संस्था मुंबईचे वैभव आहेत. सरकारी सवलती लाटून आता या जागांचा व्यावसायीक वापर करण्यापासून रोखणे गरजेचे आहे.

या बेकायदेशीर कृत्याला पायबंद घालून शैक्षणिक संस्था बंद पडू नयेत यासाठी सरकारने एक समिती नेमावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शर्मा असे म्हणतात की, या शैक्षणिक संस्थांसाठी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेने नाममात्र दराने जागा दिल्या. त्या संस्थांना पाणी, वीज कनेक्शन हे सवलतीच्या दरात दिले. मालमत्ता कर, स्टॅम्प डयुटीतून सवलती देण्यात आल्या. काही वर्ष शैक्षणिक संस्था चालवून आता या संस्था बंद करुन हे संस्थाचालक, विश्वस्त त्या जागेचा बेकायदेशीरपणे वापर खाजगी कारणासाठी करून स्वतःचे खिसे भरण्याचा त्यांचा डाव आहे.

या शैक्षणिक संस्थांमुळे आसपासच्या गरिब, सामान्य विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शिक्षण मिळत आहे त्या लाभापासून हे विद्यार्थी वंचित होतील आणि महागड्या खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षण त्यांना परवडणारे नाही.

या अनुदानित शैक्षणिक संस्था बंद करुन विद्यार्थी, पालक, यांच्यावर अन्याय तर होतच आहे परंतु या संस्था बंद पडल्याने तिथे काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावरही अन्याय करणारे आहे. अंधेरी येथील चिनॉय कॉलेजही असेच बंद करण्यात आले आहे. त्या जागेचा आता व्यावसायीक वापर करण्याचा संस्था विश्वस्तांचा प्रयत्न आहे. या प्रकरणात शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली असता हे प्रकरण त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही असे सांगून हात वर करण्यात आले आहेत.

एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी जमिनीची नोंदणी करुन त्यासंदर्भातील सर्व सरकारी लाभ घेतल्यानंतर अचानक मूळ हेतू बदलता येत नाही अशी कायद्यात तरतूद असतानाही या संस्था व त्या संस्थांचे विश्वस्त बेकायदेशीरपणे या शैक्षणिक संस्था बंद करुन नफेखोरीसाठी त्या जागांचा वापर करू पहात आहेत. हे थांबवावे अशी मागणी राजेश शर्मा यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here