अडगाव बु येथील गुटखा माफियावर विशेष पथकाची धडक कारवाई, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत लक्षावधी रुपयांचा गुटखा जप्त…

कुशल भगत

हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशील अडगाव बु. येथे सर्व प्रकारचे अवैध धंदे खुलेआम जोमात सुरू असतात. यापूर्वीसुद्धा हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध अवैध धंद्यांवर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने यशस्वी आणि मोठ मोठ्या कारवाया केलेल्या आहेत.

दि 10 सप्टेंबर रोजी सकाळच्या पहाटे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाला खात्रीलायक माहिती मिळाली की अडगाव बु. येथील अक्रम खा हशमत खा वय 28 हा अवैधरित्या विनापरवाना महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा पान मसाला बाळगून विक्री करीत आहे अशा स्वरूपाच्या मिळालेल्या माहितीवरून विशेष पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकला असता त्याच्या घरातून विमल, वाह, पान बहार,

दबंग इत्यादी अनेक कंपन्यांचे विविध प्रकारचे गुटखा, पानमसाला सुगंधीत तंबाखू, इत्यादीचा मोठा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला गुटख्याची आणी प्रतिबंधक साहित्याची एकूण किंमत तब्बल (2,17,550) दोन लक्ष सतरा हजार पाचशे पन्नास रुपये इतकी आहे. आरोपी अक्रम खा हशमत खा वय 28 याला पथकाने रंगेहाथ अटक केली आणि हिवरखेड पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

उपरोक्त धाडसी कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद कुमार बहाकर अकोला आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

अडगाव बु. येथे एक कुख्यात गुटखा माफिया असून संपूर्ण अकोट आणि तेल्हारा तालुक्यात त्याची दहशत असून तो अत्यंत दादागिरीने गुटख्याच्या ठोक धंदा करतो. एव्हढेच नव्हे तर सामान्य नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, दादागिरी करणे, हे त्याचे नित्याचेच प्रताप आहेत.

दोन दिवसांपूर्वीच एका छोट्या गावातील युवकाला त्या गुटखा माफियाने आपल्या साथीदारांसह अत्यन्त क्रूरतेने मारहाण केली आणि पोलिसात तक्रार केल्यास परिणाम भोगण्याची धमकी दिल्याने त्या युवकाने भीतीपोटी तक्रार देण्याचे टाळले असल्याची सुद्धा चर्चा आहे.

ही माहिती गुप्त सूत्रांकडून विशेष पथकाला मिळाली असल्याचे बोलले जात आहे. आजची कार्यवाही त्याच्याशी निगडित असल्याची चर्चा आहे. परंतु अडगावच्या त्या “मुख्य माफिया” ची दादागिरी आणि माज उतरविल्या शिवाय आता विशेष पथक आणि पोलीस विभाग स्वस्थ बसणार नसल्याची माहिती अंतर्गत सूत्रांकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here