माती – पालापाचोळ्याने झाकला सागाचा बुंधा…महिन्यानंतर वन गुन्ह्याची नोंद…कवलेवाडा गेटमधून चिरान पोहचला चंद्रपुरात…

भंडारा – प्रशांत देसाई

राखीव वनातील सागाच्या झाडाची अवैध तोड प्रकरण गाजत असताना, रोज नवनवे प्रकार समोर येत आहे. साग झाडाची तोड केल्यानंतर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून, वनाधिकारी यांनीच सागाच्या बुंध्यावर माती आणि पालापाचोळा टाकून झाकला.

तर, लाकडांचा चिरान लाखनी येथून शासकीय वाहनातून कवलेवाडा गेटवरून मुसळधार पावसात चंद्रपुरात पोहचला. त्यानंतर तब्बल महिनाभरानंतर अज्ञात व्यक्ती विरुद्ध वन गुन्ह्याची नोंद करून प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रकार कोका वन्यजीव अभयारण्यात घडला आहे.कसई गेटजवळ कक्ष क्रमांक १६८ मध्ये साग झाडाची दिवसाढवळ्या तोड झाली. यात वनाधिकारी यांचा सहभाग असून त्यांनी वृक्षतोडीसाठी वनमजुरांचा वापर केला.

वृक्षाची तोड केल्यानंतर तिथे उपस्थित क्षेत्र सहायक ओ. एस. बनोटे आणि वनरक्षक मोहन हाके यांनी झाड कटाई केल्याचे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून, झाडाचा बुंधा माती आणि पालापाचोळा टाकून झाकला. मात्र, कोंबड्याला कितीही झाकून ठेवले तरी तो पहाटे आरवतोच. असाच काहीसा प्रकार कोका अभयारण्यातील साग वृक्षाच्या तोड प्रकरणात घडला आहे.

नियमबाह्यरीत्या झाडाची कत्तल आणि अधिकाराचा दुरुपयोग करून वनाधिकारी यांनी झाडाचे ओंडके शासकीय वाहनातून ‘चिरान’साठी चिखलाबोडी मार्गे लाखनीला नेले. चिरान झालेला लाकूडफाटा वनाधिकारी यांच्या शासकीय वाहनाने कवलेवाडा गेटवरून लगेच दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला आणण्यात आला. यावेळी जोरदार पाऊस सुरू होता आणि रात्रीचे दहा वाजून गेले होते.

महत्वाचे म्हणजे, सायंकाळी सहानंतर सकाळी सहापर्यंत कोका अभयारण्यात जड आणि चारचाकी वाहनाला प्रवेशबंदी आहे, हे विशेष. असे असतानाही केवळ वनपरिक्षेत्राधिकारी जाधव यांचे शासकीय वाहन असल्याने आणि त्यात लाकूडफाटा असल्याने त्या वाहनाची ‘नोंद न करता’ सोडण्यात आले. हे वाहन रामटेके नामक चालक चालवीत होता.

सागवृक्षाची अवैध तोड ही जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली. त्यानंतर चिरान करून त्यापासून दिवाण, सोफासेट, लाकडी आलमारी असे लाकडी साहित्य बनविले. त्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. सागवृक्ष तोड प्रकरणातून सहीसलामत बाहेर आल्यानंतर चिंतामुक्त झालेल्या वनाधिकारी यांनी तब्बल महिनाभरानंतर म्हणजेच जुलैच्या शेवटी वन गुन्ह्याची नोंद केली.

वनगुन्ह्याची नोंद ही अज्ञात व्यक्ती विरुद्ध केली आहे, हे महत्वाचे. सायंकाळी ते सकाळी सहापर्यंत वाहतुकीसाठी हा मार्ग बंद राहतो. अशास्थितीत मुख्य मार्गालगत असलेले सागाच्या झाडाची अज्ञात व्यक्ती तोड करून तो नेला, असे कोका अभयारण्य वनाधिकारी हे सांगत सुटले आहेत.

अभयारण्य वनाधिकारी त्यांचे पथक, एसटीपीएफ पथक यांची येथे चोवीस तास गस्त असते, असे असताना स्वतः केलेल्या चोरीवर पांघरून घालून दुसऱ्याकडे बोट दाखविण्याचा हा प्रकार आहे. याबाबत वनपरिक्षेत्राधिकारी सचिन जाधव, तत्कालीन क्षेत्र सहायक ओ. एस. बनोटे आणि तत्कालीन वनरक्षक मोहन हाके यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here