अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांनी साधली सुवर्ण संधी, कृषी धोरणात सहभागी होऊन झाले वीजबिल थकबाकीमुक्त…

धोरणात १०० टक्के सूट मिळण्यासाठी मार्च २२ पर्यंतच मुदत…

अमरावती – शेतकऱ्यांनी मार्च २०२२ पर्यंत त्यांच्याकडील वीज बिलाच्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास थकीत वीज बिल १०० टक्के माफ होणाऱ्या महाकृषी योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले असून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ५९६४ शेतकऱ्यांनी ९.४७ कोटी  रुपयांचा भरणा करून वीजबिल थकबाकीमुक्त  होण्याचा मान प्राप्त केला आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांना थकबाकीतून मोठा दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या पुढाकारातून महाकृषी ऊर्जा धोरण तयार करण्यात आले आहे.

या  धोरणात सहभागी होणाऱ्या कृषी ग्राहकांच्या मागील पाच वर्षापर्यंतच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येऊन सदर थकबाकीवर १८ टक्क्यापर्यंत व्याज न आकारता महावितरणने घेतलेल्या कर्जावरील सरासरी व्याजदराच्या अनुषंगाने व्याज आकारण्यात येऊन थकबाकी निश्चित करण्यात येत आहे व त्यानुसार शेतकऱ्यांना सवलत देण्यात येत आहे. पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज १०० टक्के माफ करण्यात येत असून केवळ मूळ थकबाकीच वसुलीसाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.  

या धोरणाचा  लाभ घेत  कृषी पंप ग्राहकांनी प्रथम वर्षी मार्च २०२२ पर्यंत थकबाकीची ५० टक्के  रक्कम  भरल्यास त्यांची  उर्वरित थकबाकी ५० टक्के माफ होणार आहे.त्यामुळे शेतकरी १०० टक्के थकबाकीमुक्त होणार आहे. मार्च २०२२ ते  फेब्रुवारी २०२३ या दुसऱ्या वर्षी थकबाकी माफी ३० %  व तिसऱ्या वर्षी भरल्यास २०%  मिळणार आहे. थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना  योजनेच्या कालावधीत चालू वीज बिलावर अतिरिक्त ५ % सवलत देण्यात आली आहे. याशिवाय  योजनेत एकदा सहभागी झालेला ग्राहक प्रत्येक चालू बिलासह त्याच्या सोयीनुसार थकबाकी भरू शकतो, अशी तरतूद या योजनेत आहे.

या योजनेमुळे गाव व जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.  कृषी ग्राहकांनी भरलेल्या रकमेच्या ३३ टक्के रक्कम ही ग्रामपंचायत स्तरावर तसेच ३३ टक्के रक्कम जिल्हास्तरावर म्हणजेच एकूण ६६% रक्कम महावितरणच्या वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणाकरीता तसेच पायाभूत सुविधांच्या निर्मिती साठी  वापरली जाणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी आणि धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. 

ते https://www.mahadiscom.in/solar/AG_Policy/index_mr.php या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या थकबाकीची रक्कम जाणून घेण्यासाठी महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.यावर शेतकऱ्यांना आपले वीज बिल,देयक भरणा,एकूण थकबाकी,मिळणारी सवलत आणि अंतिमतः भरावयाची रक्कम या सर्वांचा तपशील देण्यात आलेला आहे.

अमरावती परिमंडळाअंतर्गत  थकबाकीमुक्त झालेल्या ५ हजार ९६४ शेतकऱ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील ४०४४ शेतकरी ग्राहकांचा समावेश असून त्यांनी  मुळ थकबाकीच्या ५० टक्के माफीचा तसेच व्याज व विलंब आकाराच्या सुटीचा लाभ घेत त्यांच्याकडे असलेल्या एकून १७.१८ कोटी पैकी फक्त ६ कोटी ३२ लाख रूपयांचा भरणा केला व थकबाकीमुक्तीची संधी साधली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील १९२० कृषी ग्राहकांनीही त्यांच्याकडे असलेल्या एकून ८.४९ कोटीच्या थकबाकीपैकी केवळ ३.१५ कोटी भरून महावितरण कृषी धोरणात थकबाकीमुक्तीची संधी साधली आहे.       

या योजनेत वसूल झालेल्या एकून रकमेपैकी कृषी आकस्मिक निधी अंतर्गत  ग्रामपंचायतस्तरावर ३३ टक्के व जिल्हास्तरावर ३३ टक्के एवढी रक्कम विकासकामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीमुक्तीतून १०० टक्के बाहेर पडण्यास मदत करणाऱ्या  व गाव आणि जिल्ह्याचा विकासाला गती देणाऱ्या महाकृषी धोरणाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here