मराठीत बोलण्याची मागणी केल्याने लेखिकेला सराफा दुकानदाराने बाहेर ढकलून दिले…लेखिकेचे दुकानासमोरच ठिय्या…

मुंबई : कुलाब्यात राहणाऱ्या लेखिकेने सराफा दुकानदाराला मराठीत बोलण्याची मागणी केल्याने लेखिकेला दुकानदाराने अपमानित करीत बाहेर ढकलून दिल्याने अपमानित झालेल्या लेखिकेने गुरुवारी (8 ऑक्टोबर) दुपारपासून दुकानाबाहेर रस्त्यावर ठिय्या देऊन बसली आहे.

शोभा रजनीकांत देशपांडे असं या लेखिकेचं नाव असून मराठीत बोलण्याची मागणी केल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक देत दुकानाबाहेर ढकलून दिल्याचा आरोप या लेखिकेने केला आहे.काल दुपारी त्या कुलाब्यातील ससून डॉक परिसरात असलेल्या महावीर ज्वेलर्समध्ये गेल्या होत्या.

दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीत संवाद साधत होते. मात्र त्यांनी मराठीत बोलावे अशी त्यांना विनंती केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यास नकार तर दिलाच मात्र देशपांडे यांना दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने त्यांना दुकानाच्या बाहेर ढकलून दिलं.

यामुळे दुकानदाराने आपल्यासह मराठी भाषेचाही अपमान केल्याचा आरोप करत त्या काल दुपारपासून या दुकानासमोरील रस्त्यावर ठिय्या देऊन बसल्या आहेत. जोपर्यंत त्या सराफ आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण इथेच ठिय्या देऊन झोपून राहणार असल्याची भूमिका देशपांडे यांनी घेतली आहे.

शोभा देशपांडे यांनी ‘थरारक सत्य इतिहास’ आणि ‘इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू’ या दोन पुस्तकांचं संकलन केलं असून एक वृत्तपत्र देखील त्या चालवत होत्या. त्यांचे पती भारतीय नौदलात होते. शोभा देशपांडे गेले अनेक वर्षे मराठी भाषेसाठी लढा देत आहेत. महाराष्ट्रची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी भाषेचा अपमान होत असल्याने त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत आंदोलन सुरु केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here