अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राहणाऱ्या तीन युवकांनी ओळखीचे असलेल्या नऊ व अकरा वर्षे वय असणाऱ्या दोन बालकांचा अश्लील व्हिडिओ तयार करून समाज माध्यमातून त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल सुद्धा केला. हा धक्कादायक प्रकार पडीत बालकांच्या पालकांना माहीत होताच त्यांनी शनिवारी (दि. १२) तिवसा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करुन रविवारी (दि. १३) तिघांनाही अटक केली आहे.
तिवसा येथील रहिवासी तीन युवकांनी परिचित दोन बालकांना आठ दिवसांपूर्वी दुपारी दोन ते अडीच वाजता गावातील एका ठिकाणी नेले. आपण नवीन प्रकारचा व्हिडिओ तयार करु, असे या तिघांनी दोन बालकांना सांगितले. त्या बालकांना अश्लील कृत्य करण्यास सांगितले. त्यानंतर या तिघांनी दोन बालकांचा एकत्रितपणे अश्लील व्हिडिओ तयार केला. इतक्यावरच ते तीन महाभाग थांबले नाही तर त्यांनी तो अश्लील व्हिडिओ व्हायरल केला.
ही बाब पिडीत मुलांनी पालकांना भीतीपोटी सांगितली नाही. मात्र, शनिवारी दुपारी दाेन पिडीत बालकांपैकी एका पालकाला तो व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याचे माहित झाले व त्यांना तो दिसला. हा धक्कादायक प्रकार पाहून पालकसुद्धा हादरले. त्यांनी मुलांना विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
त्यामुळे त्यांनी तत्काळ तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही युवकाविरुद्ध कलम ६७ माहिती तंत्रज्ञान कायदा व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन रविवारी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.