अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजप नेत्यांनी अकोट मधील सामान्य कार्यकर्त्याला झापले…

आमदार रणजीत पाटील यांचा हस्तक असल्याचा ठेवला ठपका

अकोट – संजय आठवले

अकोट शहरात 3 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजनापूर्वी एका भाजप नेत्यांचे घरी अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजप नेत्यांनी एका सामान्य कार्यकर्त्यावर तो आमदार रणजीत पाटील यांचा हस्तक असल्याचा ठपका ठेवून त्याला चांगलेच झापल्याची चर्चा भाजपच्या गोटातून शहरभर झिरपू लागली आहे. या चर्चेमुळे स्वतःस शिस्तप्रिय म्हणविणार्‍या आकोला जिल्हा भाजपची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 फेब्रुवारी रोजी अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या सौंदर्यीकरण कामाचे अनधिकृत भूमिपूजन आयोजित करण्यात आले होते.या भूमिपूजनासाठी आमदार भारसाकळे यांनी अकोला जिल्ह्यातील भाजपचे रणजीत पाटिल वगळता सर्व आमदार व ज्येष्ठ नेत्यांना आमंत्रित केले होते.

सगळे आमंत्रित मान्यवर शहरात आल्यानंतर भूमिपूजनापुर्वी शहरातील एका मोठ्या भाजप नेत्याच्या घरी चहापानासाठी गेले. तेथे घरातील हॉलमध्ये नेतेमंडळींची व बाहेर कार्यकर्त्यांच्या आसनाची व्यवस्था केलेली होती. त्यावेळी अचानक हॉलमधील एका नेत्याचे लक्ष कार्यकर्त्यांच्या गर्दीत बसलेल्या आमदार रणजीत पाटील यांच्या कथित कार्यकर्त्याकडे गेले. त्याने ह्या कार्यकर्त्याला हॉलमध्ये बोलावून घेतले.

आणि हॉलचे दार बंद करून एका तेजस्वी नेत्याने व जिल्हा भाजप वर आपली कमांड निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अधीर नेत्याने त्या कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तू रणजीत पाटलां सोबत का राहतो? ते नेहमीच आमचे विरोधात काम करतात, ते आमच्या गटाचे नाहीत,त्यांचे सोबत राहायचे असेल तर आमच्याकडे मुळीच यायचे नाही.अशा तोफगोळ्यांचा भडिमार या ज्येष्ठ नेत्यांनी त्या कार्यकर्त्यावर केला.

एकीकडे बंद दाराआड या भडिमाराने तो कार्यकर्ता अवाक होऊन भीतीने लोळागोळा झाला होता तर दुसरीकडे दाराबाहेरच्या कार्यकर्त्यांनी कान टवकारले होते. अगदी रागावून आणि जोरजोरात बोलणाऱ्या या नेत्यांना कळलेच नाही की आपण बंदद्वार बोलत असलो तरी आपले जोराचे बोलणे बाहेर कान टवकारून बसलेले कार्यकर्ते ऐकत आहेत. त्यामुळे जेव्हा आत मध्ये जेव्हा ही दरडावणीची ही फोडणी दिली जात होती तेव्हाच बाहेरील कार्यकर्त्यात कुजबूज सुरू झाली होती.

काही वेळाने हॉलचा दरवाजा उघडून तो तेजस्वी नेता बाहेर आला आणि लगेच मागे वळून त्याने त्या कार्यकर्त्याला या बंदद्वार प्रसंगाची वाच्यता बाहेर न करण्याची तंबी दिली. त्यावर या ज्येष्ठ नेत्यांच्या रुद्रावताराने घाबरगुंडी उडालेल्या त्या सामान्य कार्यकर्त्यांची वाचाच बंद झाल्याने, त्याच्या तोंडून शब्दही निघाला नाही. बिचार्‍याने केवळ मान हलविली. परंतु ही तंबी हॉल बाहेरील कार्यकर्त्यांनी मन लावून ऐकली.

त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांनी हॉलचे दार बंद करूनही काहीच उपयोग झाला नाही.उलट त्यांच्या तावातावाच्या बोलण्याने हॉलमध्ये भाऊबंदकी नाटकाची रिहर्सल सुरू असल्याचे गुपित हॉल बाहेरील कार्यकर्त्यांना कळाले.परिणामी प्रथम दबक्या सुरात या कार्यकर्त्याला झापल्याची, त्याच्या कारणांची सुरू झालेली चर्चा हा हा म्हणता संपूर्ण शहरात पसरली आहे.

एका विवाह प्रसंगी संघाच्या एका जेष्ठ पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात चर्चा झाली असता शिस्तप्रिय पक्ष म्हणून भाजपची निर्माण झालेली प्रतिमा अकोला जिल्ह्यातील काही भाजप नेत्यांमुळे मलिन होत असल्याची मनस्वी खंत त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगाने अकोला जिल्हा भाजप मध्ये प्रचंड गटबाजी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.सोबतच आपल्यांनाच अडवा आणि आपल्यांचीच जिरवा ही योजना हे ज्येष्ठ नेते तन-मन-धनाने राबवीत असल्याचेही दिसून आले आहे. सोबतच ज्येष्ठ नेत्यांच्या भाऊबंदकीने सामान्य कार्यकर्ते मात्र प्रताडीत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here