मेंदूत रक्तस्राव झाल्याने खाजगी रुग्णालयात सुरू होते उपचार.
मनोर – पालघर तालुक्यातील महामार्गालगतच्या सातीवली तलाठी सजाचे तलाठी अशोक अहिरे (वय.54)यांचा कोरोनावरील उपचारादरम्यान रवीवारी (ता.27) मृत्यू झाला.महसूल विभागात तलाठी पदावर त्यांनी बावीस वर्षे सेवा बजावली होती.त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस लागू झालेल्या टाळेबंदीमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना जेवण आणि रेल्वे प्रवासाची व्यवस्था महसूल विभागामार्फत करण्यात आली होती. या कामात व्यस्त असताना तलाठी अशोक अहिरे यांना जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.
सुरुवातीला त्यांच्यावर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.परंतु प्रकृती खालावल्याने त्यांना वसईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.कोरोनावर मात करून घरी आल्यानंतर पुन्हा श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने वसईतील प्लॅटिनम रुग्णालयात दाखल झाले होते.त्यानंतर मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांना मीरा रोड मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मनमिळाऊ, हसतमुख आणि सदैव मदतीला तत्पर असल्याने मनोर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान होते.त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या पालघर शाखेने शोक व्यक्त केला असून तलाठ्यांना विमा कवच आणि सानुग्रह अनुदान लागू करण्याची मागणी पालघरच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.