संत गाडगेबाबा कर्मभूमि पुरस्कार जिवाजी वाघमारेंना प्रदान…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

मूर्तिजापूर येथील संत गाडगे बाबा कर्मभूमि सेवा प्रतिष्ठानचा २०१९ चा प्रतिष्ठीत ‘संत गाडगेबाबा कर्मभूमि पुरस्कार’ परभणीचे सामाजिक कार्यकर्ते जिवाजी वाघमारे यांना रविवारी (ता.३१) परभणीत जाऊन प्रदान करण्यात आला.अकोल्याचे नेहरू युवा केंद्र, येथील नेहरू युवा मंडळ आणि संत गाडगेबाबा कर्मभूमि सेवा प्रतिष्ठान च्या वतीने परभणीच्या सुभेदार रामजी आंबेडकर सभागृहात आयोजित राष्ट्रसेवा दीव्यांग मेळावा व सत्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या मेळाव्याचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे प्र- कुलगुरू श्याम शिरसाट यांनी केले. नांदेडच्या अप्पर कोषागार अधिकारी ज्योतीताई बगाडे अध्यक्षस्थानी होत्या. पत्रकार गणेश पांडे, पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर, मंचक खंडारे, प्रतिष्ठानचे सचिव अनिल डाहेलकर, नेहरू युवा मंडळाचे कार्याध्यक्ष नरेंद्र खवले, संभाजी शेवटे मंचावर उपस्थित होते.

संत कबीर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबांच्या प्रतिमापूजनानंतर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख स्वरूपातील संत गाडगेबाबा कर्मभूमि पुरस्कार जिवाजी वाघमारे यांना प्रदान करण्यात आला.प्रस्ताव न मागविता समाजाच्या विविध क्षेत्रात अतुलनीय कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन हा पुरस्कार प्रदान केला जातो,

असे यावेळी प्रास्ताविकातून पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर यांनी नमुद केले व प्रतिष्ठानच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. नेत्र दीव्यांग असणारे जिवाजी वाघमारे यांचा संघर्ष, खडतर वाटचाल व यशस्वीतेचा आलेख प्र- कुलगुरू श्याम शिरसाट यांनी मांडला. ज्योतीताई बगाडे यांनी आपल्या मनोगतातून जिवाजींच्या उत्तुंग कर्तृत्वाचा गौरव केला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here